
भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीत ग्रामीण सहकाराची भूमिका महत्त्वाची : सतीश मराठे
ओरोस : जागतिक पातळीवरील विविध संकटांचा सामना करत भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक ठरला आहे. भारताने सर्वसमावेशक विकासाचे मॉडेल स्वीकारले असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) आणि सहकारी संस्थांना सक्षम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सहकार भारती सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, ओरोस येथे ‘ग्रामीण सहकार संवाद’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सतीश मराठे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महाराष्ट्र राज्य काजू महामंडळाचे संचालक तथा सहकार भारती कोकण विभाग प्रमुख धनंजय यादव, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सहकार भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अमित आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठे म्हणाले की, युक्रेन-रशिया युद्धासारख्या जागतिक संकटांचा परिणाम होऊनही भारताकडे गरजेपेक्षा तिप्पट अन्नसाठा आहे. सेवा क्षेत्रातही भारताने मोठी झेप घेतली असून, मोबाईलवरून होणाऱ्या डिजिटल पेमेंटसारख्या आधुनिक व्यवस्थांमध्ये भारत आघाडीवर आहे. गेल्या काही वर्षांत सुमारे ५५ कोटी नवीन बँक खाती उघडली गेली असून, आयुष्मान भारत, अटल पेन्शन योजना आणि विविध विमा योजनांमुळे सामान्य नागरिक आर्थिक प्रवाहात सहभागी झाला आहे.
ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासासाठी सहकार क्षेत्राने स्थानिक गरजांवर आधारित उपक्रम उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आपल्या जिल्ह्यात आपण काय करू शकतो’, याचा सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.नव्याने स्थापन झालेल्या ‘त्रिभुवन’ सहकारी विद्यापीठामार्फत ५० हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले असून, शॉर्ट टर्म सर्टिफिकेटपासून पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. सरकार, सहकारी संस्था आणि सामाजिक संस्था एकत्र आल्यास ग्रामीण भागातील कौशल्यविकासाला मोठी गती मिळेल आणि ग्रामीण बँकांचा देशाच्या विकासातील वाटाही वाढेल, असा विश्वास मराठे यांनी व्यक्त केला.
या संवादामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांसमोरील सद्यस्थितीतील समस्या, नव्या संधी, संस्थांच्या सक्षमीकरणाच्या दिशा आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीतील आव्हानांवर सखोल चर्चा झाली. शेती, मत्स्यव्यवसाय, काजू, दुग्धव्यवसाय, पर्यटन आणि ग्रामीण उद्योग या क्षेत्रांना सहकाराच्या माध्यमातून अधिक बळ देण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले.
यावेळी मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, मच्छीमार, काजू उत्पादक आणि युवा उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Subscribe to my channel






