वेरवली रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी प्रवासी संघटना आग्रही

प्लॅटफॉर्म, सर्व गाड्यांचे थांबे आणि मूलभूत सुविधांसाठी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे साकडे

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील वेरवली रेल्वे स्थानकाचे क्रॉसिंग रेल्वे स्थानकाऐवजी नियमित रेल्वे स्थानकात रूपांतर करण्यात यावे. तसेच येथे प्लॅटफॉर्मसह प्रवाशांसाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वेरवली रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मार्च २०१६ पासून सुरू असलेल्या वेरवली रेल्वे स्थानकाचा परिसरातील सुमारे ३० ते ४० गावांतील नागरिकांना लाभ होत आहे. दररोज अंदाजे १०० ते १५० प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. गणेशोत्सव, शिमगोत्सव तसेच एप्रिल-मे महिन्यात चाकरमान्यांची गावाकडे ये-जा वाढल्याने प्रवाशांची संख्या ४०० ते ५०० पर्यंत पोहोचते. मात्र, या स्थानकावर केवळ पॅसेंजर गाडीलाच थांबा असून, प्लॅटफॉर्मची सुविधा नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना रेल्वेत चढताना व उतरताना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात प्रवाशांना थांबण्यासाठी पुरेशा निवारा व्यवस्थेचाही अभाव आहे. जवळच्या आडवली आणि विलवडे रेल्वे स्थानकांवर जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.वेरवली हे लांजा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून, लांजा-कोल्हापूर मार्गासह परिसरातील अनेक गावांसाठी हे रेल्वे स्थानक सोयीचे आहे. कोकणातील डोंगराळ भौगोलिक परिस्थिती आणि रस्ते प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, वेरवली स्थानकावर रेल्वेच्या अधिक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

विद्यार्थी, चाकरमानी आणि व्यावसायिकांना मुंबई, सुरत व गुजरातच्या दिशेने प्रवास करण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानक गाठावे लागते. वेरवली ते रत्नागिरी हे सुमारे ५० किलोमीटरचे अंतर असल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात. त्यामुळे वेरवली रेल्वे स्थानकाचा नियमित रेल्वे स्थानक म्हणून विकास झाल्यास लांजा आणि राजापूर तालुक्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर वेरवली रेल्वे स्थानकाचे नियमित रेल्वे स्थानकात रूपांतर करावे, येथे स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारावा, अधिक रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा तसेच प्रवाशांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आवश्यक मंजुरी मिळवून द्यावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

संघटनेचे सचिव सुरेश महादेव चव्हाण, माजी मंडल अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, गणेश जाधव, रमाकांत पात्रे, सुभाष कांबळी, प्रथमेश बेंडल आणि अजय गुरव यांनी आमदार प्रमोद जठार यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले.यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी या मागणीची दखल घेत, संबंधित समस्येवर लवकरच उपाययोजना करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

error: Content is protected !!