२०२४ मध्ये कोणाचं मुंडकं गाडायचं, ते मतदारांनी ठरवलंय ; सतीश सावंतांनी घेतला “त्या” मिम्सचा समाचार

केंद्रीयमंत्री आठ दिवस तळ ठोकूनही माझा “मतात” पराभव करण्यात त्यांना अपयश

मालवण येथील शिवसेनेच्या बैठकीत सतीश सावंतांचा भाजपसह राणे कुटुंबावर हल्लाबोल

जिल्हा बँकेतील सत्ता पैशाने विकत घेतल्याचाही आरोप ; जिल्हा बँकेची जिल्हा परिषद होऊ देणार नाही

कुणाल मांजरेकर

मालवण : पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे भाजपाचे निवडणुका जिंकण्याचे समीकरण बनले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाचा एक नेता स्वतःच्या गाडीत पैसे घेऊनच फिरत होता, असा आरोप शिवसेना नेते सतीश सावंत यांनी शिवसेनेच्या वतीने मालवण येथे आयोजित जिल्हा बँक संचालकांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलताना केला आहे. माझ्या पराभवानंतर माझं मुंडकं डोक्याखाली घेतलेला एक फोटो व्हायरल झाला आहे. लोकशाहीमध्ये कोणी कोणाला गाडू शकत नाही. लोकशाही मध्ये कसं कोणाला गाडायचं, हे आम्हाला आणि कणकवली, देवगड, वैभववाडीमधील सूज्ञ मतदारांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे २०२४ मध्ये येथील मतदार ते काम चोखपणे बजावतील, असा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा बँकेत आपला विजय झाल्याने आत्ता जिल्हा बँकेची ही जिल्हा परिषद करण्याचे स्वप्न काहींना पडत आहे. मात्र जिल्हा परिषदेप्रमाणे जिल्हा बँकेत बेनामी ठेकेदारी होऊ देणार नाही, आमचे आठही संचालक बॅंकेच्या कारभारावर अंकुश ठेवतील. १२७७ संस्थांचे भवितव्य या आठ संचालकांच्या हातात आहे, असेही सावंत म्हणाले.

मालवण शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक दैवज्ञ भवन येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी पक्ष संघटना वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत निवडून आलेले महाविकास आघाडीचे जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, सुशांत नाईक, मेघनाद धुरी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, बाबा सावंत, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, बाळ महाभोज, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, मंगेश गावकर, नितीन वाळके, विजय पालव, अमित भोगले, पं. स. सदस्या निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, पूनम चव्हाण, श्वेता सावंत, दीपा शिंदे, रश्मी परुळेकर, नंदा सारंग, अंजना सावंत, भारती आडकर, मंदार ओरोसकर, प्रसाद मोरजकर, दीपक देसाई आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सतीश सावंत यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना भाजपवर जोरदार टीका केली. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असला तरी आम्हाला एका गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की एका केंद्रीय मंत्र्याला जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आठ दिवस सिंधुदुर्गात येऊन तळ ठोकावा लागतो. सतीश सावंतला आठ मतं मिळू देणार नाही, असं सांगितलेलं असतानाही मला त्यांच्या उमेदवारा एवढी मदत मिळून माझा चिठ्ठीमध्ये पराभव झाला आहे. त्यामुळे केंद्रीयमंत्री तळ ठोकून सुद्धा माझा मतांमध्ये पराभव करू शकले नाही, अशा शब्दात नारायण राणेंवर सतीश सावंत यांनी टीका केली.

आणखी संतोष परब होऊ देणार नाही…

जिल्हा बँक निवडणूकीत संतोष परबवर प्राणघातक हल्ला झाला. प्रत्येक निवडणुकीत असे संतोष परब करणार ? प्रत्येक वेळी मारामाऱ्या आणि दहशतीचे वातावरण सिंधुदुर्गातील जनता खपवून घेणार नाही, असे सांगतानाच केंद्रीय मंत्र्यांनी तळ ठोकुन सुद्धा आमचे ८ संचालक निवडून आले आहेत, हा त्यांचा नैतिक पराभव आहे. यापुढे जिल्हा बँकेच्या सभागृहात चुकीचे कामकाज करण्याचा प्रयत्न झाल्यास आमचे संचालक ते हाणून पाडण्यात कमी पडणार नाहीत. भाजपच्या प्रचाराला आलेला एक नेता गाडीत पैसे ठेवून फिरत होता. ही बँक तुम्ही पैशाने विकत घेतली आहात, त्यामुळे मला पराभवाचे शल्य अजिबात नाही. वैभव नाईक, विनायक राऊत, दीपक केसरकर या सर्वांनी माझ्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. असे असताना स्वाभिमानची सोशल मीडिया खोट्या बातम्या पसरवत आहे. जिल्हा बँक भाजपाकडे गेली असली तरी सहकारातील एकाही कार्यकर्त्याला हा विजय आवडलेला नाही. यांना जिल्हा बँकेची जिल्हा परिषद करायची आहे. पण आमचे संचालक या ठिकाणी चुकीचे काम होऊ देणार नाहीत. संतोष परब वर झालेला हल्ला शेवटचा हल्ला आहे, असं सांगून २०२४ मध्ये कोणाचं मुंडकं छाटायचं, याचा निर्णय जनतेने आतापासूनच घेतल्याचे सतीश सावंत म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!