आर्थिक प्रलोभने दाखवून मालवण तालुक्यात धर्मांतरण ?

शहर व ग्रामीण भागातील काही ठिकाणी दिवसाढवळ्या प्रकार : पोलिसांनी तातडीने कारवाई करावी : मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी पोलिसांचे वेधले लक्ष

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहर तसेच काही ग्रामीण भागात काही व्यक्ती व संघटनांकडून नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून, आर्थिक मदत, नोकरी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा अथवा इतर लाभांचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल करत धर्मांतरण केले जात असल्याची गंभीर बाब मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांना सादर करत मालवण परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर धर्मांतरण प्रकारांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

गॅरी अन्ननसिएशन यांनी मनसेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वाईरकर यांच्या समवेत सकाळी मालवण पोलिसांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, मालवण शहर आणि तालुक्यात काही व्यक्ती व संघटनांकडून नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून, आर्थिक मदत, नोकरी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा अथवा इतर लाभांचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल करत धर्मांतरण केले जात असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. काही ठिकाणी धार्मिक भावना भडकविणे, समाजात फूट पाडणे, मानसिक दबाव निर्माण करणे, खोटी माहिती पसरविणे व नागरिकांचे ब्रेनवॉश करण्याचे प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारांमुळे मालवण परिसरातील सामाजिक सलोखा, शांतता व कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर गंभीर प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. संबंधित व्यक्ती, संस्था किंवा संघटनांच्या कार्यपद्धतीची तपासणी करण्यात यावी.

नागरिकांना आमिषे दाखवून किंवा दबाव टाकून धर्मांतरण केले जात असल्यास त्याची सखोल चौकशी करावी.परवानगीशिवाय सभा, मेळावे किंवा प्रचार कार्यक्रम आयोजित केले जात असल्यास त्यांची देखील तपासणी करुन कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने पुढील ७ दिवसांच्या आत चौकशी सुरू करून यावर योग्य ती कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. पोलीस विभागामार्फत निश्चित पणे या प्रकरणाची चौकशी करू, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली.

error: Content is protected !!