ट्रिपलसीट वरून हटकल्याने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की ; मालवण मधील प्रकार

सहा जणांचे कृत्य ; पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कार्यवाही सुरू

मालवण | कुणाल मांजरेकर

ट्रिपल सीट वरून हटकल्याने युवकांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार मालवण शहरात घडला आहे. या प्रकरणात सहा जण चौकशीच्या कचाट्यात सापडले असून यातील काही जण अल्पवयीन असल्याचे समजते. याबाबत उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू होती. मात्र या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. प्रकरण मिटवण्यासाठी राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. ही धक्काबुक्कीची घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मालवण पोलीस ठाण्यात कार्यरत वाहतूक पोलीस आपल्या एका सहकारी मित्रासह काही कामानिमित्त वायरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी एका नाक्यावर दोन मोटरसायकलवरून सहाजण जात असल्याचे दिसून आल्याने या पोलिसाने त्यांना थांबवले. त्यावेळी याठिकाणी वादावादी होऊन वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्याच्या सोबत असलेल्या मित्राला देखील मारहाण झाल्याचे समजते. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. सायंकाळी या प्रकरणात चौघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक आणि राजकिय पक्षाचे पदाधिकारीही पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी प्रकरण तडजोडीने मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र तक्रारदार पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम होता. तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. उशिरापर्यंत याबाबत पुढील कार्यवाही सुरू होती.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!