देवगड : अस्तित्वात नसलेल्या कथित अणूऊर्जा प्रकल्पावरून विरोधक एकीकडे रान पेटवत असताना रोजगाराच्या मुद्द्यावरून स्थानिक युवक देवगडात रस्त्यावर उतरण्याच्या पवित्र्यात आले आहेत. कोकणातील युवकांच्या भविष्याचा विचार, विकसित कोकण, समृद्ध कोकण निर्मितीच्या मागणीसाठी आणि स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणपूरक विकासाच्या समर्थनार्थ रविवारी ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता जामसंडे येथील दिर्बादेवी स्टॉप येथून युवकांची भव्य मोटारसायकल रॅली निघणार आहे.
‘ही रॅली एकजुटीसाठी, युवकांच्या भविष्यासाठी’ आहे. “फिरायला कोकणात यायचं, मग नोकरीला कोकणाच्या बाहेर का जायचं?” असा सवाल करणारी आहे. युवकांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होऊन कोकणाच्या विकासासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रॅलीत पर्यावरणपूरक विकास प्रकल्प, स्वच्छ ऊर्जा, हरित व समृद्ध कोकण तसेच स्थानिकांना रोजगार या मुद्द्यांवर जनजागृती करण्यात येणार आहे. चुकीच्या प्रचाराला बळी न पडता जागृत व्हा. कोकणातील युवकांचा रोजगार दुसऱ्या राज्यात जाऊ नये, यासाठी एकत्र येण्याची गरज आहे,” असा संदेश या रॅलीतून देण्यात येणार आहे.