विद्यार्थ्यांच्या कल्पनांना स्टार्टअपची दिशा; भोसले इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्टार्टअप वर्कशॉप’

महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे सीईओ डॉ. श्रीकांत पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअपच्या माध्यमातून व्यावसायिक रूप देण्यासाठी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इनक्युबेशन सेंटरतर्फे महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या सहकार्याने ‘स्टार्टअप वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना व प्रकल्पांना तज्ज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेत त्यांनी स्टार्टअप उभारणीसाठी आवश्यक बाबी, नवकल्पनांचे व्यावसायिकीकरण, बाजारपेठेची गरज आणि उत्पादनाची व्यवहार्यता याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी केआयटी इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनचे सीईओ सुधीर अरळी यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कल्पनांमध्ये आवश्यक सुधारणा आणि त्यांना प्रत्यक्ष व्यवसायाच्या संधीमध्ये रूपांतरित करण्याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे व संकल्पनांचे सादरीकरण केले. या प्रकल्पांवर तज्ज्ञांनी सकारात्मक अभिप्राय देतानाच उत्पादनाची उपयुक्तता, बाजारपेठेतील मागणी, तांत्रिक व्यवहार्यता आणि पुढील वाटचालीसाठी आवश्यक बदल याबाबत सूचना केल्या. संस्थेच्या इनक्युबेशन सेलच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती मिलिंद देसाई यांनी दिली. विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रतिष्ठान, माणगावचे अध्यक्ष सुनील उकीडवे, केआयटी इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनचे संदीप लाड, संस्थेचे सीईओ ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, प्राचार्य डॉ. रमण बाणे, फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन टीपीओ हेड मिलिंद देसाई, टीपीओ महेश पाटील, केशव मणेरीकर आणि आशिष सुवारे यांनी केले.

error: Content is protected !!