एकीकडे गद्दारीचा डाग ; मालवणात निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मालवणात ठाकरे शिवसेनेकडून “निष्ठेची साठी” आगळा वेगळा उपक्रम

मालवण : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन सोहळा येथील ठाकरे शिवसेना शाखेत अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या वतीने “निष्ठेची साठी” या विशेष उपक्रमाचे यानिमित्ताने आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पक्षाशी कठीण काळातही एकनिष्ठ राहिलेल्या ज्येष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, वंदनीय बाळासाहेबांनी ६० वर्षांपूर्वी ज्या विचारांची पेरणी केली, त्या विचारांशी प्रामाणिक राहून आज आपण इथे ‘निष्ठेची साठी’ साजरी करत आहोत. सध्या काही खासदार आणि नेते पदे व स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले, फुटले असतील. पण खासदार फुटले म्हणून शिवसेना संपत नाही. शिवसेना ही कोणत्याही नेत्यावर नाही, तर रक्ताचे पाणी करून पक्ष उभा करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आणि जनतेवर चालते. नेते जातात, पण मतदार आणि सामान्य शिवसैनिक कुठेही जात नाही, तो आजही मातोश्रीशी आणि उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आहे.

श्री. खोबरेकर पुढे म्हणाले, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि तेवढाच आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. आज ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार आपण केला, त्यांनी कठीण काळात पक्षाला सांभाळले आहे. त्यांच्याच प्रेरणेने आपल्याला पुढे जायचे आहे. आता आपल्याला रडत बसायचे नाही, तर लढायचे आहे. घाबरायचे काहीच कारण नाही, अधिक जोमाने काम करायचे आहे. मालवणच्या प्रत्येक गावागावात, प्रत्येक घरात जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे. पक्ष संघटना दुप्पट वेगाने वाढवणे, हीच वंदनीय बाळासाहेबांना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलेली खरी गुरुदक्षिणा ठरेल.

या कार्यक्रमाला मालवण तालुक्यातील शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. काही लोकप्रतिनिधी फुटले असले, तरी तळागाळातील सामान्य मतदार आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा सूर यावेळी उमटला. त्यामुळे न डगमगता पक्ष संघटना अधिक जोमाने वाढवण्याचा निर्धार उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी केला.

या कार्यक्रमाला शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, रश्मी परुळेकर, पूजा करलकर, दीपा शिंदे, रुपा कुडाळकर, नगरसेविका अनिता गिरकर, माधवी प्रभू, सिद्धेश मांजरेकर, उमेश मांजरेकर, किशोर गावकर, राजा शंकरदास, रवी तळाशीलकर यांच्यासह तालुक्यातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!