
१ सप्टेंबरपासून जलक्रीडा हंगामाला सुरुवात; २०२६-२७ हंगामापूर्वी संयुक्त मार्गदर्शन कार्यशाळेत प्रशासनाचा इशारा
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जलक्रीडा हंगामाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील जलक्रीडा व्यवसाय अधिकृत, सुरक्षित आणि नियमबद्ध पद्धतीने चालविण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी पर्यटन संचालनालयाकडे अधिकृत नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात जलक्रीडा हंगाम २०२६-२७ पूर्वी आयोजित संयुक्त मार्गदर्शन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, जलक्रीडा व्यावसायिक तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पर्यटकांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्यजिल्ह्यात वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळत असली, तरी समुद्रकिनारी जलक्रीडा करताना अपघाताचा धोका लक्षात घेता पर्यटकांची सुरक्षा ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अवैध जलक्रीडा व्यवसाय चालू दिला जाणार नाही. सर्व व्यावसायिकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून, विहित शुल्क भरून आणि नियमावलीचे पालन करून अधिकृत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
अधिकृत नोंदणीमुळे आपत्कालीन परिस्थितीत संबंधित व्यावसायिकांशी तातडीने संपर्क साधून मदत पोहोचवणे शक्य होईल. तसेच पर्यटकांची संभाव्य फसवणूक आणि अनधिकृत जलक्रीडा व्यवसायाला आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.
बोटींचे फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य
कार्यशाळेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी जलक्रीडा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्ती व्यवस्थापन आणि विभागांमधील समन्वयाबाबत माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून बोटींची नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र तसेच आवश्यक सुरक्षा उपकरणांच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस विभागाने सागरी सुरक्षेबरोबरच अनधिकृत जलक्रीडा व्यावसायिकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती दिली.पर्यटन संचालनालयाच्या वतीने जलक्रीडा व्यवसायासाठी आवश्यक ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले.
जलक्रीडा व्यावसायिकांचा व्हॉट्सॲप समूह
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या. अनुपस्थित जलक्रीडा व्यावसायिकांपर्यंत नियमावली पोहोचविणे तसेच हवामानाचे इशारे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यावसायिकांचा संपर्क डेटाबेस तयार करून अधिकृत व्हॉट्सॲप समूह तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन केले. आगामी जलक्रीडा हंगामात पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे आणि व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यशाळेत करण्यात आले.






Subscribe to my channel






