माजी नगराध्यक्षांचे अपयश दाखवताना स्वपक्षाच्या माजी आमदारांचे अपयशही अधोरेखित

भुयारी गटार योजना १२ वर्षे रखडली; मग वैभव नाईकांच्या दहा वर्षांच्या आमदारकीत काम पूर्ण का झाले नाही?

म्हाडगुत साहेब, एक बोट आमच्याकडे दाखवताना चार बोटे आपल्याच पक्षाकडे आहेत, हे विसरू नका : महेश कांदळगावकर

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या भुयारी गटार योजनेवरून माजी नगराध्यक्षांच्या कार्यकाळातील अपयश दाखवण्याचा प्रयत्न करताना त्याच कालावधीतील आपल्या पक्षाचे तत्कालीन आमदार वैभव नाईक यांचे अपयशही आपणच अधोरेखित करत आहात, याचे भान म्हाडगुत साहेबांनी ठेवावे. आमच्या कार्यकाळातील प्रलंबित कामांचा जाब विचारत असाल, तर तब्बल दहा वर्षे आमदार राहिलेल्या वैभव नाईक यांनाही हाच प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवा, असा सल्ला माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी दिला आहे.

मालवण शहराची भुयारी गटार योजना २०१२ पासून प्रत्यक्षात सुरू झाली. मात्र, विविध अडचणींमुळे आजतागायत ही योजना पूर्णत्वास जाऊ शकलेली नाही, हे वास्तव आहे. २०१६ ते २०२१ या आमच्या नगरपरिषदेच्या कार्यकाळातही हे काम पूर्ण होऊ शकले नाही, याची आम्ही जाहीर कबुली त्यावेळी वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. कारण चांगल्या कामाचे श्रेय घ्यायचे असेल, तर अपूर्ण कामाची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, ही आमची भूमिका आहे.

आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भुयारी गटार योजनेला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. तत्कालीन आमदार वैभव नाईक आणि आमदार दीपकभाई केसरकर यांच्या प्रयत्नातून या योजनेसाठी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. साधारण २०१८ मध्ये मिळालेल्या या निधीमुळे कामाला काही प्रमाणात गती मिळाली. याबद्दल मालवणवासीयांच्या वतीने आम्ही त्यांचे जाहीर आभारही मानले होते.

याच काळात मालवण बाजारपेठ ते रेवतळे या भुयारी गटार पाइपलाइनची यशस्वी चाचणी तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर २०१९ आणि २०२० मध्ये कोरोना महामारीचे संकट आले. लॉकडाऊन, निधीची कमतरता आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे अनेक विकासकामांना अपेक्षित गती देता आली नाही. निसर्ग चक्रीवादळासह विविध संकटांमुळे आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील प्रत्यक्ष कामकाजाची संधीही मर्यादित राहिली.

डिसेंबर २०२१ मध्ये आमचा कार्यकाळ संपल्यानंतर नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट लागू झाली. २०२१ ते २०२४ या काळात प्रशासकीय कारभार सुरू असताना रखडलेल्या विकासकामांबाबत आम्ही वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला. आमच्या कार्यकाळात सुरू झालेली अनेक कामे पूर्ण होत नसल्याबद्दल प्रशासनाला जाब विचारला. त्यामध्ये भुयारी गटार योजनेचाही समावेश होता. मग या प्रशासकीय कालावधीत ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? प्रशासकाकडून ही कामे मार्गी का लावून घेतली नाहीत? याचे उत्तरही म्हाडगुत साहेबांनी मालवणच्या जनतेला द्यावे.

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न! भुयारी गटार योजनेला १२ ते १३ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. या कालावधीतील २०१४ ते २०२४ अशी तब्बल दहा वर्षे वैभव नाईक आमदार होते. मग त्यांच्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात ही योजना पूर्ण का होऊ शकली नाही? हा प्रश्न त्यांना विचारण्याची जबाबदारी आपली नाही का? म्हाडगुत साहेब, आमच्या कार्यकाळातील अपूर्ण कामांसाठी आम्हाला जबाबदार धरत असाल, तर हाच न्याय आपल्या पक्षाच्या माजी आमदारांनाही लावावा लागेल. एक बोट आमच्याकडे दाखवताना चार बोटे आपल्याच दिशेने आहेत, हे विसरू नका!उगाच वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी मालवणच्या जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नका. आमच्या कार्यकाळातील अपयशाचा लेखाजोखा मांडताना आपणच आपल्या पक्षाच्या माजी आमदारांचे अपयश अधोरेखित करत आहात, याची नोंद घ्यावी.

शेवटी, आपण ज्या संस्थेमध्ये कार्यरत आहात, त्याच संस्थेवर आणि प्रशासनावर राजकीय हेतूने वारंवार अविश्वास दाखवून स्वतःचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणू नका. कोणाला तरी खूश करण्यापेक्षा मालवणच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घ्या, हा आमचा मित्रत्वाचा सल्ला!, असे महेश कांदळगांवकरयांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!