पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रीय काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

आठ दिवसात दरवाढ मागे घेऊन पुरवठा सुरळीत करा ; अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा

सिंधुदुर्ग : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन जिल्हाधिकाऱ्यांना ही दरवाढ मागे घेण्याबरोबरोबरच जिल्ह्यात सुरळीतपणे पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्यासाठी निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात याची कार्यवाही न झाल्यास संपूर्ण जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील ११ दिवसात पेट्रोल व डिझेलच्या किमती ८ रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आलेल्या आहेत, ही दरवाढ आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. गेल्या १२ वर्षांत पेट्रोलच्या किमती ३८ टक्क्यांनी, तर डिझेलच्या किमती ६२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले असतानाही, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७२ रुपये लिटरच्या वर जाऊ दिल्या नाहीत. महागाईचा भार डॉ. मनमोहनसिंह यांनी जनतेवर पडू दिला नाही. पण मागील काही वर्षात कच्च्या तेलाचा भाव ५०-५५ डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास रेंगाळत होता तेव्हाही पेट्रोल प्रति लिटर १०० रुपयांच्या आसपास होते.गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून ४३ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे आणि मागील चार-पाच दिवसात केलेल्या चार रुपयांच्या दरवाढीतून भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, या कंपन्यांनी काही तासांतच बाजारातून ₹१२,४०० कोटींची कमाई केली, ही नफेखोरी जनतेच्या खिशावर दरोडा टाकून केलेली आहे.

पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतो. फक्त इंधनच महाग होत नाही तर जीवनावश्यक वस्तूसह सर्व प्रकारची महागाई होते. उत्पन्न वाढत नाही पण महागाई मात्र वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. सरकारने जनतेला दिलासा देणे गरजेचे आहे, त्यामुळे संकटात असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी. पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरुळीत होईल यासाठी व्यवस्था करावी. शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो, त्यासाठी डिझेलची आवश्यकता आहे. राज्यातील अनेक पेट्रोल पंप बंद असल्याने डिझेलअभावी शेतीची कामे खोळंबलेली आहेत. शेतीची कामे वेळेत झाली नाहीत तर अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होईल व पुन्हा महागाई वाढेल, हे दुष्टचक्र थांबवले पाहिजे. उपरोक्त सर्व मुद्यांचा संवेदनशिलतेने विचार करून पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी व पेट्रोल डिझेलचा पुरवठा कसलीही बाधा न येता सुरुळीत करावा. अन्यथा आठवड्याभराने न्यायासाठी हे आंदोलन जिल्हाभर करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबूलकर, सेवादल समन्वयक अजिंक्य गावडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर, बाळू मेस्त्री, प्रवीण वरुणकर, वि. के. सावंत, विद्या प्रसाद बांदेकर, महेश तेली, शांताराम नेवरेकर, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, जेम्स फर्नांडीस, प्रदीप मांजरेकर, उमेश कुलकर्णी, अभय मालवणकर, मंदार शिरसाट, बाळा धाऊसकर, संजय लाड, सुरज घाडी, प्रवीण आचरेकर, तबरेज शेख, चंदन पांगे, उल्हास शिरसाठ, यश तेली, बाळा शिरोडकर, प्रमोद घाडीगावकर, लक्ष्मण शिरोडकर, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक केतन गावडे, उमेश मोंडकर, शेलटकर, आनंद परुळेकर, अतिश उर्फ भाई जेठे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!