ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव वेगाने डिझायर गाडीला धडक
मालवण : मोटरसायकलस्वारांच्या ग्रुप मधून मालवणात फिरायला आलेल्या युवकांच्या मोटरसायकलने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटर सायकल वरील ओंकार चव्हाण या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल महामार्गांवरील सावरवाड चेक पोस्ट नजिकच्या वळणावर घडली. या अपघातात मोटर सायकलवरील सुदेश सापळे (रा. फोंडाघाट) हा दुसरा युवक किरकोळ जखमी झाला असून डिझायर चालकाला देखील दुखापत झाली आहे. जखमीना उपचारासाठी ओरोसला नेण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फोंडाघाट हरकुळ येथील हे दोन युवक आपल्याकडील यामाहा कंपनीची स्पोर्ट्स बाईक ( MH04 JX 7091) घेऊन आपल्या अन्य सहकाऱ्यांसह ४ ते ५ बाईक घेऊन मालवणात फिरायला आले होते. अपघातग्रस्त बाईक सुदेश सापळे याची होती. मालवणात फिरून झाल्यानंतर ते माघारी जात असताना सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सावरवाड चेकपोस्ट नजीकच्या वळणावर दुसऱ्या सहका ऱ्याच्या दुचाकीला ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक समोरून येणाऱ्या लातूर पासिंगच्या डिझायर गाडीला बसली. या अपघातात ओंकार चव्हाण याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर सुदेश सापळे याच्यासह डिझायर गाडीच्या चालकाला दुखापत झाली. अपघाता नंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरु होता.