आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण : उद्या निकाल
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्या वरील प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपी आ. नितेश राणे आणि माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आज पूर्ण झाला आहे. उद्या ३० डिसेंबर रोजी या जामीन अर्जावर निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले.
आ. नितेश राणे, गोट्या सावंत यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर २८ डिसेंबर रोजी सायंकाळी उशीरापर्यंत आ. नितेश राणे, गोट्या सावंत यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर आज दुपारनंतर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील घरत यांनी केलेल्या आ. नितेश राणे, गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली. तर ऍड. संग्राम देसाई यांनी जामीन मिळण्याची मागणी करताना आपला युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी याबाबत उद्या ३० डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले.