नगरपालिकेच्या उधळलेल्या घोड्याला नागरिकांकडून “लगाम” : आठवडा बाजार पूर्ववत !

नगरसेवक जगदीश गावकरही आक्रमक ; आठवडा बाजार बंद करण्याचे मागितले परिपत्रक

लेखी आदेश मागताच पालिकेच्या “हौशी” कर्मचाऱ्यांचे पलायन ; “बंद” चा घाट नक्की कोणासाठी होता ? संभ्रम निर्माण

कुणाल मांजरेकर

मालवण नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर स्वतःची हुकूमशाही राबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाला आठवडा बाजाराच्या मुद्द्यावरुन संतप्त नागरिकांनी सोमवारी चांगलाच दणका दिला. नगरपालिका प्रशासनाने बेबंदशाहीपणा दाखवत कोणतेही आदेश नसताना आठवडा बाजार बंद करण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्यानंतर याविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. माजी नगरसेवक जगदीश गावकर यांनीही आक्रमक होत येथे उपस्थित असलेल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आठवडा बाजार बंद करण्याबाबतचा लेखी आदेश मागितल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः पलायन केले. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आठवडा बाजार बंद करण्याचा घाट नक्की कोणासाठी घातला होता ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने राज्य सरकारने रविवारी मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर केली आहे. मात्र त्या अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात न आल्याने जिल्ह्यात कोणत्या गोष्टी सुरू राहणार आणि कोणत्या गोष्टी बंद राहणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. आठवडा बाजाराबाबत देखील प्रशासनाने अद्याप पर्यंत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे दर सोमवारी भरणाऱ्या मालवणच्या आठवडा बाजारासाठी आज पहाटेपासून परजिल्ह्यातील व्यापारी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले. मात्र नगरपालिका प्रशासनाने आठवडा बाजार लावण्यास सक्त मनाई केली. काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाने अद्यापपर्यंत आठवडा बाजाराबाबत कोणतीही घोषणा न केल्याची बाब निदर्शनास आणून दिली. मात्र येथे उपस्थित पालिका कर्मचाऱ्यांनी बाजार लावण्यास मनाई करीत गाड्या अडवून धरल्या होत्या.

नगरपालिकेच्या उधळलेल्या घोड्याला नागरिकांचा “लगाम”

जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत आदेश नसतानाही मालवण नगरपालिकेच्या काही ‘हौशी’ कर्मचाऱ्यांनी आठवडा बाजारासाठी आलेल्या गाड्या अडवल्याची बाब समोर येताच नागरिक संतप्त झाले. परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन बाहेरील व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवणाऱ्या नगरपालिकेच्या “हौशी” कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी माजी नगरसेवक जगदीश गावकर यांनी या आदेशाबाबतचे परिपत्रक मागितले असता या कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यामुळे नागरिक आक्रमक होताच कर्मचार्‍यांनी येथून पलायन केले. त्यानंतर आठवडा बाजार पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाला. त्यामुळे कोणतेही आदेश नसताना नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कोणाच्या हितासाठी आठवडा बाजार बंद करण्याचा घाट घातला होता ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3842

Leave a Reply

error: Content is protected !!