मालवणात नगरपालिका आरक्षण सोडत जाहीर ; प्रभाग ३ अनुसूचित जातीसाठी राखीव

ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण जाहीर ; प्रत्येक वॉर्डात एक जागा सर्वसाधारण तर एक महिलांसाठी आरक्षित

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी १० प्रभागातील २० जागांसाठी आरक्षण सोडत सोमवारी येथील मामा वरेरकर नाट्यगृहात काढण्यात आली. यावेळी लोकसंख्येच्या निकषानुसार शहरातील वॉर्ड क्र. ३ “अ” हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. तर १९ पैकी १० जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. उर्वरीत ९ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या झाल्या आहेत.

प्रांताधिकारी वंदना खरमाळे आणि नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबवण्यात आली. सर्वप्रथम २०११ च्या जनगणनेनुसार वॉर्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असल्याने या वॉर्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला. त्यानंतर कु. वेदिका सुभाष कुमठेकर हिच्या हस्ते उपस्थितांच्या मान्यतेनुसार एकाचवेळी प्रभागातील पुरुष आणि स्त्री आरक्षणाची चिठ्ठी काढुन सोडत काढण्यात आली. यावेळी प्रत्येक प्रभागातील वॉर्ड “ब” हा स्त्रियांसाठी राखीव ठरवण्यात आला. त्यामुळे प्रभाग ३ “अ” हा अनुसूचित जाती आणि प्रभाग ३ “ब” हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आला. यावेळी प्रभाग ३ वगळून प्रभाग क्र. १ ते २० मध्ये “अ” जागा सर्वसाधारण तर “ब” जागा सर्वसाधारण महिला साठी आरक्षित करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, पूजा करलकर, महेंद्र म्हाडगूत, महेश जावकर, अमेय देसाई, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, बाबी जोगी, मनोज मोंडकर, सन्मेश परब यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!