“त्या” व्हायरल फोटोवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडले मौन !

कुणाल मांजरेकर

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडून शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत असल्याच्या कारणास्तव शिवसेनेत बंडाचे निशाण रोवत भाजपच्या पाठिंब्यावर थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियासह काही प्रसारमाध्यमांवरही प्रसिद्ध झाला आहे. या फोटोवर स्वतः एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले असून अलीकडच्या कालावधीत शरद पवारांशी अशी कोणतीही भेट न झाल्याचा खुलासा केला आहे. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी आपली शरद पवारांशी त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली होती. त्यावेळचा हा फोटो असल्याचे स्पष्टीकरण ना. शिंदे यांनी दिले आहे.

महाविकास आघाडी सरकार मध्ये काँग्रेस विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचे निशाण रोवले. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हाच आरोप करत स्वतःचा स्वतंत्र गट निर्माण केला. दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेच्या या फुटीर गटाला भाजपाने समर्थन दिल्याने एकनाथ शिंदे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्हायरल फोटो वरून काही प्रसारमाध्यमांवरही हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसवरच आरोप केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या असताना स्वतः एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत हे वृत्त धादांत खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करतानाच सदरील फोटो ११ नोव्हेंबर २०२१ रोजीचा असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट करत याचा स्क्रीन शॉट ट्विटरवर शेअर केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!