मुंबई : केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांनी प्रभाग क्र. ८९ मधून विजय मिळवला आहे.
वॉर्ड क्रमांक ८९ मध्ये एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात काँग्रेस कडून कमलेश जंगबहादूर चौरसिया, शिवसेना शिंदे गटाकडून राजेश प्रकाश नाईक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून गितेश विनायक राऊत, तर कदम राकेश गोविंद, हरकचंद लिलाधर गुढका, संभाजी दत्तू पाटील, तजेला बाळासाहेब बगाडे, वर्मा अनिल कुमार, वेलमणी, प्रमोद कुमार सिंह, शिंदे मंगल निलेश हे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत होते. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे वॉर्ड क्रमांक ८९ मधील लढत चुरशीची ठरण्याची शक्यता होती.
गीतेश राऊत यांची जागा ठाकरे शिवसेना विशेषतः माजी खासदार विनायक राऊत यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. माजी आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा त्यांच्या प्रचारासाठी उपस्थिती लावली होती. या लढतीत अखेर गीतेश विनायक राऊत यांनी बाजी मारली आहे. हा विजय फक्त माझा नाही, आपल्या सर्वांच्या प्रेमाचा, विश्वासाचा, आपल्या शिवशक्तीचा, आपल्या प्रभागाचा, आपला विजय आहे! ही मशाल आपल्या प्रभाग क्रमांक 89 ला विकासाची वाट दाखवेल, असे गीतेश राऊत यांनी म्हटले आहे.