रत्नागिरीत शाश्वत पाणी नियोजनासाठी ‘पाणी परिषद’ संपन्न

आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती; जलसंधारण आणि पाणी बचतीवर भर

रत्नागिरी : भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि प्रभावी पाणी नियोजनाची गरज अधोरेखित करणारी ‘रत्नागिरी जिल्हा शाश्वत पाणी परिषद’ उत्साहात संपन्न झाली. या परिषदेला आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती होती.

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, हिरवळ प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘भविष्यातील पाणीटंचाई आणि पाणी नियोजन’ हा परिषदेचा मुख्य विषय होता.

वाढती लोकसंख्या, बदलते हवामान आणि जलस्रोतांवरील वाढता ताण लक्षात घेता पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. जलसंधारण, भूजल पातळीत वाढ, पावसाच्या पाण्याचे संकलन, पाणीगळती रोखणे आणि पारंपरिक जलस्रोतांचे जतन यांसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाणी नियोजन करण्यावर चर्चा झाली.

आमदार प्रमोद जठार यांनी परिषदेत सहभागी होत जलप्रश्नाशी संबंधित विविध विषयांची माहिती घेतली. प्रशासन, जलक्षेत्रात कार्यरत संस्था, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक आणि नागरिक यांनी समन्वयाने काम केल्यास जलसंधारणाच्या उपक्रमांना व्यापक स्वरूप देता येईल, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यातील भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी लोकसहभागातून जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. या परिषदेतून ‘पाणी वाचवा, पाणी जपवा आणि भविष्यासाठी पाणी सुरक्षित ठेवा’ हा संदेश देण्यात आला.

error: Content is protected !!