हरीत लवादाच्या आदेशानुसार धामापूर तलावात मूर्ती विसर्जन करण्यास कायमस्वरूपी मनाई

मालवण तहसीलदारांचे आदेश ; मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार

मालवण | कुणाल मांजरेकर

हरीत लवादाच्या आदेशानुसार मालवण तालुक्यातील ऐतिहासिक धामापूर तलावात मूर्ती विसर्जन करणे, तलावाच्या पाण्यामध्ये कपडे-भांडी धुणे तसेच तलावात आंघोळ करणे यावर कायमस्वरूपी मनाई आदेश निर्गमीत करण्यात आल्याची माहिती मालवणच्या तहसीलदार सौ. वर्षा झालटे यांनी दिली आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

धामापूर तलावाला ऐतिहासिक महत्त्व, नैसर्गिक सौंदर्य आणि ५०० वर्षे जुन्या कार्यक्षम जल व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन आणि जलसिंचन आयोगाने (ICID) जागतिक वारसा जल व्यवस्थापन स्थळ (WHIS) पुरस्कार प्रदान केला आहे. धामापूर तलाव तर्फे मालवण शहर आणि धामापूर, काळसे, कुंभारमाठ गावांना पिण्याचे पाणी पुरवठ्यासह अनेक पर्यावरणीय सेवा प्रदान केली जाते. यात काळसे आणि धामापूरच्या शेतकऱ्यांसाठी सिंचन, गोड्या पाण्यातील माशांची पैदास, भूजल पुनर्भरण, सभोवतालच्या वन परिसंस्थेला आधार, पुराला प्रतिबंध आणि पर्यावरणाभिमुख पर्यटन यांचा समावेश आहे. मा. हरित न्यायाधिकरण पुणे यांचेकडील OA क्र. 74/2025 खटल्या मधील मागणी क्र. १ अन्वये सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यात असलेल्या धामापूर तलावात मूर्ती विसर्जन, कपडे-भांडी धुणे यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे आदेश दिलेले आहेत. जेणेकरुन तलावाची पर्यावरणीय अखंडता जपता येईल. तसेच मूर्तीमध्ये धातूच्या पिन, प्लास्टिक आणि काचेसह रासायनिक रंग आणि जैवविघटन न होणारे सजावटीचे साहित्य वापरले जाते. यामुळे सदर तलावात गाळ साचणे, पाणी धारण क्षमता कमी होणे, जलचरात अडथळा, युट्रोफिकेशन आणि जलचरांना नुकसान होते. त्यामुळे वर्षा झालटे, कार्यकारी दंडाधिकारी मालवण यानी नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन दि. 27/08/2025 पासून ग्रामपंचायत धामापूर येथील धामापूर तलाव येथे कायम स्वरूपी मनाई आदेश जारी केले आहेत. यात 27/08/2025 पासून धामापूर तलावामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात येत आहे. धामापूर तलावाच्या पाण्यामध्ये कपडे-भांडी धुणे तसेच तलावात आंघोळ करणे, तलावाच्या पाण्यामध्ये अस्थी विसर्जन करणे किंवा अन्य कोणत्याही वस्तूंचे विसर्जन करणे, तलावाच्या पाण्यामध्ये सांडपाणी किंवा अन्य कोणताही द्रव पदार्थ तलावाच्या जलस्रोतात सोडण्यास बंदी घालण्यात येत आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास अथवा धामापूर तलावाच्या व त्याच्या परिसरातील जैवविविधतेला कोणत्याही प्रकारे प्रदूषण किंवा हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास, संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३, पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६, महाराष्ट्र महसूल संहिता, १९६६, महाराष्ट्र सिंचन कायदा, १९७६ तसेच मा. सर्वोच्च न्यायालय (WP 230/2001, WP 304/2018) आणि मुंबई उच्च न्यायालय (PIL 87/2013) यांच्या आदेशांनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. सदर आदेशाची अंमलबजावणी ही पोलीस विभाग, महसुल विभाग, मालवण नगरपालिका, धामापुर ग्रामपंचायत, जलसंपदा विभाग हे करतील, असे तहसीलदारांच्या आदेशात म्हटले आहे.

error: Content is protected !!