चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’ उत्साहात!

‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती; संघटन बळकटीकरणाचे केले आवाहन

चिपळूण : भाजपच्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची राष्ट्रचिंतन बैठक चिपळुणात उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकीला आमदार प्रमोद जठार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

संपूर्ण वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताने बैठकीची सुरुवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात प्रशांत यादव यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करत बूथस्तरापासून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

आमदार प्रमोद जठार यांनी अभियानाचे महत्त्व विशद करत भाजपची ध्येय-धोरणे आणि भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. यावेळी SIRच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

तसेच नवनिर्वाचित चिपळूण शहर मंडळ अध्यक्ष आशिष खातू आणि शहर महिला मोर्चा अध्यक्ष रुही खेडेकर यांचा आमदार प्रमोद जठार व जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीला जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!