मालवणच्या मातीतून टेक्नॉलॉजीची भरारी; सॉफ्टलॅब्स ग्रुपचा MACCIAकडून दिमाखदार सन्मान

संस्थापक मिथिलेश बांडिवडेकर, संस्थापक टीम सदस्य योगेश राणे यांचा सत्कार पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार

सिंधुदुर्ग : मालवणपासून सुरू झालेल्या सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या तंत्रज्ञानाच्या प्रवासाने उद्योगविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि सिंधुदुर्गच्या व्यवसाय व विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर (MACCIA) कडून सॉफ्टलॅब्स ग्रुपचा नुकताच विशेष सन्मान करण्यात आला.

सॉफ्टलॅब्स ग्रुपचे संस्थापक मिथिलेश बांडिवडेकर आणि संस्थापक टीम सदस्य योगेश राणे यांचा पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मालवणातून सुरू झालेल्या तंत्रज्ञानाधारित उद्योगाच्या वाटचालीला मिळालेला हा सन्मान सिंधुदुर्गच्या उद्योगविश्वासाठीही अभिमानाचा क्षण ठरला.

यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, आमदार प्रमोद जठार, आमदार निलेश राणे, विजय केनवडेकर यांच्यासह व्यापारी व उद्योजक समुदायातील मान्यवर उपस्थित होते.

महानगरांच्या पलीकडे तंत्रज्ञानाच्या संधी पोहोचवण्याच्या उद्देशाने सॉफ्टलॅब्स ग्रुपने मालवणमध्ये डेव्हलपमेंट सेंटर उभारले आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना आयटी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गातील तरुणांसाठी आयटी क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आणि जिल्ह्यात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची सक्षम परिसंस्था उभारण्याचे काम सुरू आहे.

विशेष म्हणजे, ‘मोठ्या शहरांकडे जाण्याऐवजी मोठ्या शहरांतील तंत्रज्ञानाच्या संधी मालवणात आणायच्या’ या विचारातून सॉफ्टलॅब्स ग्रुपची वाटचाल सुरू झाली. स्थानिक प्रतिभेला जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राशी जोडण्याच्या या प्रयत्नांना मिळालेला MACCIAचा सन्मान ही त्या वाटचालीची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.

मालवणच्या मातीतून सुरू झालेला सॉफ्टलॅब्सचा हा तंत्रज्ञानाचा प्रवास आता सिंधुदुर्गातील नव्या पिढीसाठी रोजगार, कौशल्य आणि उद्योजकतेच्या नव्या संधींचे दालन खुले करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. या कार्याची दखल घेत सन्मान आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल सॉफ्टलॅब्स ग्रुपने MACCIAचे आभार मानले असून, ‘मालवणातूनच घडवण्याचे’ कार्य भविष्यातही अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!