
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ, नागरिकांना दिलासा
मालवण : मालवणमधील वायरी येथील मारुती मंदिर परिसरातील वीज समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या विद्युत रोहित्राचे (ट्रान्सफॉर्मर) शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. या सुविधेमुळे परिसरातील कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वायरी मारुती मंदिर परिसरात कमी दाबाचा वीजपुरवठा आणि अन्य वीज समस्यांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्यांची दखल घेत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव आणि नगरसेविका नीना मुंबरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याने प्रत्यक्ष कामाचे स्वरूप प्राप्त झाले.
ट्रान्सफॉर्मरची उभारणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. दिलेला शब्द पूर्ण करून परिसरातील वीज समस्येवर उपाययोजना केल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे आभार मानण्यात आले. यापूर्वी सातेरी देवी मंदिर मार्गावरही विद्युत ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला असून, परिसरातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी ही कामे महत्त्वाची ठरत आहेत.
मालवणच्या विकासकामांना गती
शहरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवक शहराच्या विकासासाठी तसेच जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत, असे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
या लोकार्पण सोहळ्याला नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका नीना मुंबरकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेविका भाग्यश्री मयेकर, नगरसेविका अश्विनी कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, मच्छीमार आघाडी तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, अवी सामंत, सूर्यकांत फणसेकर, संदेश चव्हाण, श्रीकांत वेंगुर्लेकर, साई बांबूळकर, बंड्या गावकर, पूजा खराडकर, सौ. बांबूळकर, गोविंद गावकर, विरेश चव्हाण, योगेश गवंडी, विजय आडेकर, दिलीप नाईक, साईराज चव्हाण, साईल जाधव, बबलू गावकर, तेजस लुडबे, नंदू देसाई, गणेश परब यांच्यासह शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
वायरी मारुती मंदिर परिसरातील ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण हा केवळ एका सुविधेचा शुभारंभ नसून, स्थानिक वीज समस्या सोडविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले यश असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.







Subscribe to my channel






