
प्रौढ साक्षरता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम; आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांनी दिले आरोग्यदायी जीवनशैलीचे धडे
मालवण : शिक्षण हे केवळ अक्षरओळख करून देणारे माध्यम नसून व्यक्तीच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणारे आणि समाजाच्या विकासाला गती देणारे प्रभावी साधन आहे. प्रत्येक प्रौढ साक्षर नागरिक म्हणजे विकसित भारताच्या वाटचालीतील एक महत्त्वाची पायरी आहे, या संदेशासह लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने आंतरराष्ट्रीय प्रौढ साक्षरता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
प्रौढ साक्षरता दिनाचे औचित्य साधून क्लबच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी साक्षरतेचे महत्त्व, प्रौढ शिक्षणाची गरज आणि साक्षरतेमुळे व्यक्तीच्या जीवनात होणारे सकारात्मक बदल यावर विचार मांडण्यात आले. साक्षरतेमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, निर्णयक्षमता विकसित होते आणि जीवनमान उंचावण्यास मदत होते. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रौढ साक्षरतेला विशेष महत्त्व असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
‘योग्य आहार’ हाच निरोगी जीवनाचा पाया
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांनी ‘आहाराचे महत्त्व आणि योग्य आहार’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात संतुलित आणि सकस आहाराचे महत्त्व, आहाराची योग्य निवड, पोषणमूल्ये तसेच आरोग्यदायी जीवनशैली याबाबत त्यांनी उपयुक्त माहिती दिली. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केवळ आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा योग्य आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे डॉ. ओरसकर यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कै. सरोज परब यांना श्रद्धांजली
दरम्यान, लायन्स क्लब ऑफ मालवणची सप्टेंबर महिन्यातील जनरल मीटिंगही पार पडली. बैठकीच्या प्रारंभी क्लबच्या विद्यमान सेक्रेटरी पूनम चव्हाण यांच्या मातोश्री कै. सरोज परब यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रौढ साक्षरता दिनानिमित्त क्लबच्या वतीने सर्क्युलर प्रकाशित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत साक्षरता, आरोग्य आणि जनजागृतीच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या हस्ते आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, मुकेश बावकर, राजा शंकदास, जयश्री हडकर, शांती पटेल, उमेश शिरोडकर, सचिन शरबिद्रे, मनाली दळवी, मीना घुर्ये, रूपा कांदळगावकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.






Subscribe to my channel






