औषधांच्या पलीकडे आरोग्याची दिशा; भोसले फार्मसी कॉलेजची सावंतवाडीत जनजागृती रॅली

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; औषधांचा सुरक्षित वापर आणि फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा प्रभावी संदेश

सावंतवाडी : जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सावंतवाडी शहरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. औषधांचा सुरक्षित व योग्य वापर, औषधांबाबतची आवश्यक काळजी तसेच आरोग्यव्यवस्थेत फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका आणि जबाबदारी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.

जगन्नाथराव भोसले उद्यान येथून रॅलीला सुरुवात झाली. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. विजय जगताप, वरिष्ठ अधिव्याख्याता सत्यजित साठे, डॉ. विनोद मुळे, डॉ. प्रशांत माळी, डॉ. तुषार रुकारी यांच्यासह प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.

रॅलीने रामेश्वर प्लाझा, नगरपालिका, श्रीराम वाचन मंदिर, राजवाडा, उपजिल्हा रुग्णालय या मार्गावरून प्रवास करत पुन्हा भोसले उद्यान येथे सांगता केली. विद्यार्थ्यांनी औषधांचा योग्य व सुरक्षित वापर, औषधे घेताना घ्यावयाची काळजी तसेच आरोग्य क्षेत्रातील फार्मासिस्टची भूमिका अधोरेखित करणारे आकर्षक फलक आणि घोषवाक्ये प्रदर्शित केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त घोषणांमुळे रॅलीदरम्यान शहरात जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले.

पथनाट्यातून औषध वापराबाबत प्रभावी संदेश

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून औषधांच्या जबाबदार वापराबाबत जनजागृती केली. औषधे व गोळ्या घेताना कोणती काळजी घ्यावी, स्वतःहून औषधांचा वापर का टाळावा आणि योग्य मार्गदर्शनासाठी फार्मासिस्टची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत प्रभावी संदेश पथनाट्यातून देण्यात आला. या जनजागृती रॅलीला सावंतवाडी नगरपरिषद तसेच पोलीस विभागाचे सहकार्य लाभले.

दरम्यान, जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त उद्या कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ‘फार्मासिस्ट ऑफ द ईयर’ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!