मालवण : मालवण शहर आणि परिसरात शेकडो कलाकार घडवणारे कलातपस्वी तथा रंगाचे जादूगार बाळकृष्ण गंगाराम उर्फ बी. जी. गिरकर (वय ८२ वर्षे, रा. बांगीवाडा ) यांचे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. येथील टोपीवाला हायस्कुलमध्ये जवळपास ३२ वर्षे कला शिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावताना अनेक कलाकार घडवले.
बी. जी. गिरकर हे शिस्तप्रिय कलाशिक्षक म्हणून ओळखले जात. १९७० ते २००२ या कालावधीत त्यांनी टोपीवाला हायस्कुल मध्ये कलाशिक्षक म्हणून सेवा दिली होती. या कालावधीत येथील अनेक विद्यार्थ्यांना कला विषयात त्यांनी निपुण केले. त्यांच्या हाताखाली तयार झालेले अनेक विद्यार्थी आज कला क्षेत्रात स्वतःचे नाव करून आहेत. कला शिक्षक असताना पाच वर्षे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष पद त्यांनी सांभाळले होते. सेवानिवृत्ती नंतर देखील त्यांनी कलेची निरंतर साधना केली होती. मुंबईतील नामांकित जहांगीर आर्ट गॅलरी, जे जे स्कुल ऑफ आर्ट, शिवाजी नाट्य मंदिरात त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली होती.
अलीकडे काही दिवस ते वृद्धापकाळाने आजारी होते. आज मध्यरात्री त्यांचे निधन झाले. सोमवार पेठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा वैभव, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भाजप महिला शहर चिटणीस महिमा मयेकर यांचे ते वडील तर फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष महेश मयेकर यांचे सासरे होत.