
‘राजाराम बाबुराव नेरुरकर ज्वेलर्स’च्या यशस्वी वाटचालीची दखल; उमेश नेरुरकर यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान
मालवण | कुणाल मांजरेकर
सोन्याची झळाळी अनेकांकडे असते; मात्र विश्वासाची चमक पिढ्यान्पिढ्या टिकवणे हीच खरी कमाई! अशा विश्वासाच्या जोरावर तब्बल १०८ वर्षांचा सुवर्ण वारसा जपत सिंधुदुर्गच्या व्यावसायिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मे. राजाराम बाबुराव नेरुरकर ज्वेलर्सचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) कडून विशेष गौरव करण्यात आला.
नेरुरकर ज्वेलर्सचे सर्वेसर्वा तथा मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश पुरुषोत्तम नेरुरकर यांचा पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तब्बल चार पिढ्यांपासून विश्वास, दर्जा आणि ग्राहकसेवेची परंपरा जपणाऱ्या नेरुरकर ज्वेलर्सच्या कार्याची दखल घेऊन मिळालेला हा सन्मान सिंधुदुर्गच्या व्यावसायिक क्षेत्रासाठीही अभिमानाचा क्षण ठरला.
यावेळी MACCIAचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, आमदार प्रमोद जठार, आमदार निलेश राणे यांच्यासह व्यापारी व उद्योजक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
१९१४ मध्ये पेटलेली कारागिरीची ज्योत आजही तेवतेय!
नेरुरकर ज्वेलर्सच्या या सुवर्ण प्रवासाची सुरुवात १९१४ मध्ये स्वर्गीय राजाराम बाबुराव नेरुरकर यांनी दागिने घडविण्याच्या कारागिरीपासून केली. हातातील कलाकुसर, व्यवहारातील प्रामाणिकपणा आणि ग्राहकांशी निर्माण झालेला विश्वास यामुळे या व्यवसायाची पायाभरणी अधिक भक्कम होत गेली.
पुढे स्वर्गीय पुरुषोत्तम नेरुरकर आणि स्वर्गीय श्रीकृष्ण नेरुरकर यांनी या व्यवसायाला नवी ओळख देत ‘राजाराम बाबुराव नेरुरकर ज्वेलर्स’ हे नाव घराघरात पोहोचवले. सिंधुदुर्गातील विश्वासार्ह ज्वेलर्स म्हणून निर्माण झालेली ही ओळख काळाच्या ओघात अधिक मजबूत होत गेली.
सिंधुदुर्गातून थेट मुंबईच्या हृदयात…
दुसऱ्या पिढीतील उमेश पुरुषोत्तम नेरुरकर यांनी व्यवसायाची धुरा स्वीकारल्यानंतर परंपरेला आधुनिकतेची जोड दिली. बदलत्या काळाची गरज ओळखून मुंबई दादर येथे शाखा सुरू करत कोकणातून मुंबईत गेलेल्या ग्राहकांसाठी ‘आपल्या हक्काचे ज्वेलर्स’ अशी ओळख निर्माण केली.
या विस्तारात बंधू गिरीश कुमार आणि संजय नेरुरकर यांची मोलाची साथ लाभली. त्यानंतर २०२१ मध्ये कुडाळ येथे तिसरी शाखा सुरू झाली. विजय आणि अरुण नेरुरकर यांनीही या विश्वासाच्या परंपरेला समर्थपणे पुढे नेले.
चौथ्या पिढीने परंपरेला दिला आधुनिकतेचा साज
आज अंकित, हर्षल आणि प्रतीक नेरुरकर ही चौथी पिढी या व्यवसायाची धुरा सांभाळत आहे. पारंपरिक कारागिरीसोबत आधुनिक डिझाईन्स, सोने, हिरे आणि मोत्यांच्या दागिन्यांच्या निर्मितीला नवे स्वरूप देत त्यांनी नेरुरकर ज्वेलर्सच्या परंपरेला आधुनिक काळाशी जोडले आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी परवान्यात समाविष्ट असलेल्या निवडक २५ ज्वेलर्सपैकी विश्वासार्ह नाव म्हणून नेरुरकर ज्वेलर्सने आपले स्थान निर्माण केले आहे.
सन्मान म्हणजे १०८ वर्षांच्या विश्वासाची पावती!
चार पिढ्या बदलल्या, काळ बदलला, दागिन्यांच्या डिझाईन्स बदलल्या; मात्र ग्राहकांचा विश्वास मात्र कायम राहिला. याच विश्वासाच्या बळावर उभी असलेली नेरुरकर ज्वेलर्सची ही १०८ वर्षांची वाटचाल आज MACCIAच्या सन्मानाने आणखी उजळली आहे.
नेरुरकर ज्वेलर्सच्या कार्याची दखल घेत उमेश नेरुरकर यांचा करण्यात आलेला हा सन्मान म्हणजे एका कुटुंबाच्या व्यवसायाचा नव्हे, तर कोकणच्या उद्योजकतेच्या जिद्दीचा आणि पिढ्यान्पिढ्या जपलेल्या विश्वासाचा गौरव असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.






Subscribe to my channel






