हम साथ साथ है… !
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाची सुरुवात कुडाळ मधून ?
भाजपा – मनसेची उद्या संयुक्त पत्रकार परिषद : युतीवर होणार अधिकृत शिक्कामोर्तब
कुणाल मांजरेकर
कुडाळ : शिवसेना भाजपाचा काडीमोड झाल्यानंतर राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा आणि मनसेच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. या भविष्यातील नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात कुडाळ मधून होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये मनसे आणि भाजपात युती होण्याची शक्यता असून याबाबतची अधिकृत घोषणा उद्या सकाळी १०.३० वाजता भाजपा – मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत होणार आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आधारित असलेली शिवसेना-भाजपाची युती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाटपावरून तूटली आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊन महाविकास आघाडीची स्वतंत्र चूल मांडली असून त्यामुळे भाजपा आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकाकी पडले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील अलीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाच्या सुरासुर मिसळताना दिसून येत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मनसेची युती होणार का ? याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, कुडाळ नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू असून पहिल्या टप्प्यात १३ जागांची निवडणूक पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात यापूर्वी ओबीसीसाठी राखीव झालेल्या चार जागांची निवडणूक घेण्यात येत आहे. याठिकाणी प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपाने सुधीर चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना आणि मनसेकडून देखील या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच भाजपाचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालेले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे येथील निवडणुकीबाबत अभिप्राय मागवला होता. मात्र निवडणूक प्रक्रिया जैसे थे सुरू ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याने कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग १६ मध्ये शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांमध्ये दुरंगी लढत होणार आहे. यामुळे प्रभाग १६ च्या निवडणुकी पासून अलिप्त राहिलेल्या भाजपाकडून मनसे उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात बुधवारी सकाळी १०.३० वाजता भाजपा- मनसे ची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत याबाबतची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील आगामी भाजपा- मनसे युतीची नांदी कुडाळमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.