प्रवासी जेटीच्या धर्तीवर मेढा राजकोट मधील मत्स्यजेटीला परवानगी मिळावी
माजी नगरसेवक गणेश कुशे यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील मेढा राजकोट येथे मत्स्य जेटी मंजूर आहे. मात्र पर्यावरण विभागाची मान्यता न मिळाल्याने अद्याप ही जेटी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे मच्छीमारांना ट्रॉलर मधून मासे उतरवणे, बर्फ डिझेल चढवणे ही कामे करताना कसरत करावी लागते. या जेटीपासून जवळच २०० मीटर अंतरावर प्रवासी जेटी बांधण्यात आली आहे. या जेटीला पर्यावरण विभागाची मान्यता मिळाल्याचे समजते. त्यामुळे याच धर्तीवर मेढा राजकोट येथील मत्स्य जेटीला परवानगी मिळावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरामधील किनारपट्टी भागामधे मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय चालतो. मालवण शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये सुमारे २०० फिशिंग ट्रॉलर्स आणि असंख्य छोट्या मासेमारी नौका गेल्या अनेक वर्षापासून मासेमारीचा व्यवसाय करतात. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय असूनही या परिसरामध्ये एक ही मत्स्यजेटी उपलब्ध नाही. त्यामुळे मच्छिमारांना ट्रॉलर मधून मासे उतरविणे, ट्रॉलरमध्ये बर्फ, डिझेल चढविणे ही कामे करताना कसरत करावी लागते. त्यासाठी स्थानिक मच्छिमारांच्या मागणी नुसार मालवण शहरातील मेढा राजकोट भागामधे मत्स्य जेटी (फिश लेंडींग सेंटर) मंजूर आहे. परंतु त्यास पर्यावरण विभागाची मान्यता न मिळाल्यामुळे ती जेटी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. तिथूनच जवळ साधारण २०० मीटरवर नव्याने प्रवासी जेटी बांधण्यात आलेली आहे. त्यास पर्यावरण विभागाची मान्यता मिळाल्याचे समजते. त्याच धर्तीवर या मत्स्यजेटीस देखील पर्यावरण विभागाने परवानगी दिल्यास मच्छिमारांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होवून त्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होऊ शकते आणि मच्छिमारी व्यवसाय करणे अजून सुलभ होऊ शकते. तरी सदर मत्स्य जेटीस पर्यावरण विभागाची मान्यता मिळवून जेटीचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात संबंधित विभागाना आदेशीत करावे, अशी मागणी श्री. कुशे यांनी केली आहे.