मालवण : मालवण बंदर जेटी ते दांडेश्वर मंदिर या किनाऱ्यावर वॉटरस्पोर्ट्स व्यवसायाची आणखी क्षमता नसताना एका बाहेरील व्यवसायिकाकडून अनधिकृतपणे पॅरासेलिंग व्यवसाय सुरु करण्यात आला असून त्यास स्थानिक जलक्रीडा व्यवसायिकानी तीव्र विरोध दर्शवत बंदर विभागाला जाब विचारला. तसेच सदर व्यावसायिकाकडे परवान्याचे कोणतीही कागदपत्रे नसताना पर्यटन संचलनालयाने त्यास परवानगी दिलीच कशी असा सवाल व्यवसायिकानी उपास्थित करत त्याच्यावर कारवाई करून त्याचा व्यवसाय बंद करण्यात यावा तसेच नव्या व्यवसायिकांना परवानगी देण्याअगोदर मालवण ते दांडी किनारपट्टीची क्षमता आहे का ? याचा सर्व्हे बंदर विभाग व पर्यटन संचालनालयाने करावा अशी मागणी व्यवसायिकानी केली.


मालवण – दांडी किनाऱ्यावर एका बाहेरील व्यवसायिकाने अनधिकृतपणे पॅरासेलिंग व्यवसाय सुरु केल्याने त्याविरोधात स्थानिक व्यवसायिकानी बंदर विभाग कार्यालयात बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, पर्यटन व्यावसायिक दामू तोडणकर, रुपेश प्रभू, गौरव प्रभू, हेमंत रामाडे, नूतन रोगे, अमित सावंत, पांडुरंग पराडकर, सहदेव जोशी, अमोल सावंत आदी उपस्थित होते.
मालवण बंदर जेटी ते दांडेश्वर मंदिर या किनाऱ्यावर सध्या ६ वॉटरस्पोर्ट्स व ९ पॅरासेलिंग व्यवसाय सुरु आहेत. त्यामुळे या किनाऱ्यावर आणखी जलक्रीडा व्यवसाय करण्याची क्षमता नाही. असे असताना ऐन पर्यटन हंगामात स्थानिकां व्यतिरिक्त एका बाहेरील व्यवसायिकाने याठिकाणी पॅरासेलिंग व्यवसाय सुरु केलेला आहे. त्याच्याकडे परवान्याची कोणतीही कागदपत्रे नाहीत, असे असताना त्याला व्यवसाय करण्याची परवानगी कशी मिळाली असा सवाल यावेळी व्यवसायिकानी उपस्थित केला.
जलक्रीडा व्यवसायासाठी मालवण किनाऱ्याची क्षमता आता अपुरी असताना सदर अनधिकृत व्यवसायिकाकडून एखादा अपघात घडल्यास त्यावर कारवाई कोणता विभाग करणार ? अपघातामुळे मालवणच्या होणाऱ्या बदनामीस जबाबदार कोण राहणार असे सवाल व्यवसायिकानी उपस्थित केले. जलक्रीडा व्यवसायातील नौकांची नोंदणी बंदर विभागाकडे, व्यवसाय परवाना पर्यटन संचालनालयाकडे आणि पुन्हा व्यवसाय तपासणी पर्यटन संचालनालयाकडे अशी गुंतागुंतीची स्थिती जलक्रीडा व्यवसायाची आहे. त्यामुळे एखादा बाहेरून येणारा व्यावसायिक स्वतःच्या मनमानीने व्यवसाय करत असेल तर आम्ही दाद कोणाकडे मागायची असा सवालही व्यवसायिकानी उपस्थित केला. त्यामुळे नवीन व्यवसायिकास परवानगी देण्यापूर्वी मालवण किनाऱ्यावरील जलक्रीडा व्यवसायाच्या क्षमतेचा एकत्रित सर्व्हे बंदर विभाग व पर्यटन संचालनालय यांनी करावा अशी मागणी व्यवसायिकानी केली.
दरम्यान, किनारा क्षमता, विनापरवाना व्यवसायावरील कारवाई व स्थानिक व्यवसायिकांची मागणी याबाबत पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक यांना मालवण बंदर विभागाकडून निवेदन व अहवाल पाठविला असून त्याबाबत आदेश होण्याचे आवाहन केले असल्याचे यावेळी बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, याप्रश्नी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले असून आम. राणे यांनी दि. २५ मार्च रोजी याविषयी चर्चा करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांनी दिली असून त्यावेळी होणाऱ्या बैठकीस जलक्रीडा व्यावसायिक, बंदर विभाग व पर्यटन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
















Subscribe to my channel




