आ. निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदाची संधी

आ. निलेश राणे यांच्या मालवण शहराच्या व्हिजनमध्ये सहभागी होता येणार याचा आनंद : महेश कांदळगावकर

मालवण : मालवण नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी प्राप्त करून दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत. आमदार निलेश राणे यांनी पुढील पाच वर्षामध्ये मालवण शहराचे जे आश्वासक असे व्हिजन ठेवले आहे, त्यामध्ये सहभाग घेता येणार असल्याचा आनंद होत असल्याचे देखील श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

२०१६ ते २०२१ या माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात मालवण नगर परिषदेमध्ये अनेक विकासात्मक कामे करण्याची संधी मिळाली होती. या कालावधीत सुमारे दोन वर्ष आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे विकास कामे करण्यात अडचणी आल्या होत्या. या कालावधीत शासनाकडून निधी उपलब्धता यामुळेही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे काही विकासात्मक कामे सुरू होण्यास विलंब झाला. त्यानंतर आमचा पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला विलंब झाल्याने जवळपास चार वर्षे प्रशासकीय राजवट होती. या प्रशासकीय कालावधीत ही कामे पूर्ण करण्यात दाखविलेल्या अनास्थेमुळे काही कामे अद्यापही अपूर्ण आहेत.

आता या स्वीकृत नगरसेवक प्राप्ती मुळे नूतन नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही कामे प्राधान्याने करून घेणे शक्य होणार आहे. . त्यामुळे नगरपरिषदे मध्ये कर्मचारी म्हणून २१ वर्ष केलेली सेवा आणि त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष केलेल्या कामाचा अनुभव याचा फायदा मालवण शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त कसा होईल याकडे भर देण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ज्या विश्वासाने आणि ज्या कारणासाठी मला स्वीकृत नगरसेवक हे पद दिले आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अस काम मी माझ्या कालावधीत करेन, असेेही महेश कांदळगवकर यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!