चिपी विमानतळ झालं, आता सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचं “सी वर्ल्ड” ही लवकरच : नारायण राणेंनी केलं जाहीर
विजयदुर्ग आणि रेडी या दोन बंदराच्या विकासालाही गती देणार ; सोशल मीडियावर व्यक्त केला निर्धार
विरोधकांनी एवढीच खुमखुमी असेल तर हायवे पासून विमानतळापर्यंतच्या एप्रॉच रोडसाठी ३४ कोटी आणून दाखवावेत
कुणाल मांजरेकर
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. चिपी विमानतळा वरून विमानानं टेक ऑफ घेण्याआधीच माझं मन उंच आकाशात विहरू लागलंय, असं म्हणतानाच चिपी विमानतळ झालं, आता सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचं “सी वर्ल्ड” ही लवकरच साकारणार असल्याचं राणेंनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर विजयदुर्ग आणि रेडी या दोन बंदराच्या विकासालाही गती देणार असल्याचं सांगतानाच विकासाच्या कामात कोणी अडथळे आणू नयेत. कोकणात कोणी गरीब राहू नये असं मला मनापासून वाटतं. कोकणातील तरुणांना रोजगार मिळावेत, घरोघरी पैसा जवळ ही माझी इच्छा आहे. त्याच्या आड कोणी येऊ नये. चालत्या गाडीला खीळ घालण्यापेक्षा एवढीच खुमखुमी असेल तर “सकारात्मक कर्तृत्व” गाजवावं. हायवे पासून विमानतळापासूनच्या एप्रॉच रोडसाठी ३४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ते अजून मिळालेले नाहीत. ते आणण्यासाठी विरोधकांनी कर्तृत्व दाखवावं.. विमानतळाला एमआयडीसीने वीज, पाणी पुरवणं गरजेचं आहे, ही कामे अजुन अर्धवट आहेत. तिथे लक्ष घालावं, असं आव्हान नारायण राणेंनी दिलं आहे.
ना. नारायण राणेंनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट मध्ये म्हटलंय की, माझ्या कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग याच तालुक्यातल्या नव्हे तर आसपासच्या सगळ्या भागातल्या लोकांना जगाशी जोडणारं विमानतळ काही तासातंच खुलं होत आहे. चिपी विमानतळावरुन विमानानं ‘टेक-ऑफ’ घेण्याआधीच माझं मन उंच आकाशात विहरू लागलं आहे. तीस वर्षं जे स्वप्न पाहिलं, ज्याचा पाठलाग केला त्याची पूर्तता आज होत असताना स्वाभाविकपणे माझं मन भूतकाळात रेंगाळतं आहे.
मला आठवतात माझ्या कोकणातले धुळीने, खड्ड्यांनी भरलेले रस्ते. पावसाळ्यात पाच-दहा मैलाचं अंतर कापणंसुद्धा मुश्किल होऊन जायचं. एसटी आणि बंदराला लागणाऱ्या बोटी एवढाच काय तो जगाशी संपर्क साधण्याचा मार्ग. पण त्यासाठी सुद्धा किती धडपडावं लागायचं. कोणाला शिक्षणासाठी परगावी जायचं असो, कोण्या लेकीबाळींना मुलाबाळांसह माहेराला यायचं असो, पोटाच्या ओढीनं कोणाला देशावर, मुंबईला जायचं असो की जीवाच्या दुखण्यानं आजारी पडलेल्या कोणाला औषध पाण्यासाठी दवाखाना गाठायचा असो, कोकणातला प्रवास ही मोठी अडचण होती. हिंदीत प्रवासाला ‘यातायात’ का म्हणतात, यावरुन ख्यातनाम साहित्यिक पु. लं. देशपांडे यांनी त्यांच्या प्रवास वर्णनात खुमारीनं लिहिलं आहे. पण अशी ‘यातायात’ कोकणी माणसाच्या नशिबालाच पुजलेली होती.
माझ्या आजारी वडीलांचं निधन वयाच्या अवघ्या बावन्नाव्या वर्षी झालं. कशामुळं ? माझ्या वरवडे गावातून त्यांना उपचारासाठी वेळेत हलवता आलं नाही. ना मी त्यांच्यापर्यंत मुंबईतून वेळेत पोहोचू शकलो. ते दिवस आपण प्रयत्नपूर्वक पालटवले. केवळ रस्ते नाहीत, प्रवासाच्या सुविधा नाहीत म्हणून असं जीवाचं माणूस गमवण्याची पाळी कोणावर येणार नाही. केवळ वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून मी वडीलांना गमावलं. त्या आठवणीनं माझ्या डोळ्यांच्या कडा आज ओलावत आहेत. पण त्याचवेळी ही वेळ दुसऱ्या कोणावर ओढवू नये यासाठी केलेला संघर्ष यशस्वी होत असल्याचा आनंद, कृतार्थता यानं माझं मन काठोकाठ भरुन आलं आहे.
आता मुंबईतलीच नव्हे तर अगदी जगाच्या पाठीवर कुठच्याही देशात असलेली माझ्या कोकणातली माहेरवाशीण अवघ्या काही तासात चिपी विमानतळावर तिच्या लेकराबाळांसह, सामानसुमानासह अवघ्या काही तासात ‘लँड’ होईल. तीही प्रवासाचा शीण न येता. हसत. मजेत. देवगडचा माझा आंबा-काजू उत्पादक मुंबई-दुबईत त्याच्या मालाचा व्यवहार करण्यासाठी जाऊन एक-दोन दिवसात आपल्या बागेत परत येईल. महाराष्ट्रभर, जगभर पसरलेल्या चाकरमान्यांना गणपतीसाठी, शिमग्यासाठी काही तासात कोकणातलं घर गाठता येईल
पोटासाठी हजारो कोकणवासीय मुंबई गाठतात. धडपडतात. कष्ट करतात. राबतात. गरीबीशी झगडत राहतात. माझंही कुटुंब त्यातलंच. पुढं माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आलो. समाजकारणात, राजकारणात स्थिरावलो. ऐंशीच्या दशकाची अखेर होती. मुंबईत ‘बेस्ट’चा चेअरमन होतो मी. १९९० ची विधानसभा निवडणूक लागली. बाळासाहेबांनी मला आदेश दिला. ‘नारायण, तू मालवण-कणकवलीतून लढायचं.’ खरं तर या मतदारसंघाची फार ओळख मला नव्हती. प्रचारासाठी अवघे २८ दिवस हातात होते. पण साहेबांचा आदेश म्हटल्यावर काय करणार? गेलो, लढलो आणि जिंकलोही. आमदार झालो.
कोकणवासियांनी मोठ्या आशेनं मला निवडून दिलं होतं. त्यांच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी पहिल्या दिवसापासून मी काम सुरु केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याची तेव्हाची ओळख फार चांगली नव्हती. रस्ते नाहीत. पुरेशी वीज नाही. एवढंच काय फेब्रुवारीनंतर प्यायला पाणीही नसे. आमच्या मालवणी भाषेत सांगायचं तर ‘दरिद्री जिल्हा’. त्यावर मी त्यांना म्हणायचो, ‘आपल्या जिल्ह्याला ‘दरिद्री’ म्हणू नका. आपण त्याचा कायापालट करू.’ सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या मार्गानं करायचा याचा विचार करताना ‘टाटां’ना काम दिलं. त्यांनी अभ्यास करुन ४८१ पानांचा अहवाल दिला. त्यात सिंधुदुर्गचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करता येईल यावर प्रमुख भर होता. त्यादृष्टीनं प्रयत्न सुरु केले. त्याचवेळी रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधांवर काम चालू केलंच होतं. त्याचीच पावती म्हणून कोकणवासियांनी १९९५ ला पुन्हा मला निवडून दिलं. यावेळी तर राज्यातही आमची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मी त्यांच्याकडं धोशा लावला. ‘माझा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करा.’ जोशी, तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना घेऊन सिंधुदुर्गात आलो आणि जाहीर कार्यक्रम घेऊन याची घोषणा केली. जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधांच्या विकासावर मी भर दिलेलाच होता. पण आता प्रामुख्यानं रोजगार निर्मितीवर, जिल्ह्यातली गरिबी दूर करण्यावर जोर द्यायचा होता. त्यासाठी पर्यटन विकास महत्त्वाचा होता.
‘टाटां ‘नी विमानतळाचा मुद्दा त्यांच्या अहवालात मांडला होता. १९९९ मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर यासाठी जोरदार प्रयत्न केले. सिंधुदुर्गात २८ स्थळं अशी निवडली होती, जिथं देशभरातून, जगातून पर्यटक येतील. यात ऐतिहासिक स्थळं होती, मंदिरं-चर्च अशी धर्मस्थळं होती. सुंदर सागरी किनारे होते. या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी देशातून ४० टक्के आणि परदेशातून ६० टक्के पर्यटक सिंधुदुर्गात यावेत असा माझा प्रयत्न होता. या पर्यटकांनी किमान सात दिवस सिंधुदुर्गात राहावं. परदेशी पर्यटकांनी आठवड्याभरात पाच लाख रुपये खर्च करावेत. हा पैसा हॉटेल, प्रवास, खरेदी, मत्स्याहार, समुद्री क्रीडा प्रकार आदी माध्यमातून आंबा उत्पादक, लाकडी खेळणी निर्माते-विक्रेते, वाहनचालक-मालक, हॉटेल व अन्य व्यावसायिक आदींच्या घरी जावा. यातून माझ्या कोकणातली गरीबी हटावी यासाठी माझा संघर्ष चालू होता.विमानतळ लवकर झाल्यानंतर याला गती मिळणार होती. पण दरम्यान सत्ताबदल झाला आणि या प्रक्रियेला काहीशी खीळ बसली. आमदार म्हणून जितकं करता येईल तितकं करत होतो. पण जिल्ह्यात पर्यटक जास्तीत जास्त खेचून आणायचे तर विमानतळ होणं गरजेचं होतं.
राजकीय प्रवासात पुन्हा मी सत्तेत गेलो. महसूलमंत्रीपद माझ्याकडं आलं. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांच्याकडं देशाचं विमान खातं आलं. त्यांच्याकडं पुन्हा मी प्रयत्न सुरु केले. ते मला म्हणाले, ‘माझ्या जिल्ह्यातली चार कामं करं मग तुम्हाला विमानतळ देतो.’ तातडीनं मी त्यांच्या जिल्ह्यातली कामं केली. त्यांनीही शब्द पाळला. सिंधुदुर्गला ‘ग्रीनफिल्ड’ विमानतळ जाहीर केलं. पण ‘ग्रीनफिल्ड’ म्हणजे प्रायव्हेट विमानतळ झालं.पुन्हा शोधाशोध चालू केली. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे बांधणाऱ्या म्हसकरांशी परिचय होता. त्यांना सूचना केली. त्यांनी माझ्या सूचना गांभिर्यानं घेतली. मी थोडा दुरदृष्टीनं विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की केवळ प्रवासी वाहतूक उपयोगाची नाही. सिंधुदुर्गात विमानतळ होतं आहे म्हटल्यावर तिथं वैमानिक प्रशिक्षण केंद्रही व्हायला पाहिजे. माझ्या कोकणातली मुलं वैमानिक होतील. मुंबई, बंगळुरू या मोठ्या विमानतळावरली गर्दी कमी करण्यासाठी सिंधुदुर्गात विमानांच पार्किंग व्हायला हवं. यातून सिंधुदुर्गातली आर्थिक उलाढाल वाढेल.सगळा विचार करुन २००९ मध्ये अखेरीस चिपी येथील विमानतळाचं भूमिपूजन झालं.
येथवरच्या प्रवासात ज्यांचा काही संबंध नव्हता असे काही लोक आता ‘बेगानी शादी मे अब्दुला दिवाना’ या पद्धतीनं उद्या होणारं चिपी विमानतळाचं उद्घाटन माझ्यामुळंच असा आव आणून नाचत आहेत. हेच लोक विमानतळ होऊ नये म्हणून भूसंपादनाला विरोध करत होते. शेतकऱ्यांना खोटी माहिती सांगून त्यांची माथी भडकावून देत होते. मी राज्यात महसूलमंत्री होतो तेव्हा आज राज्याचे अर्थमंत्री असणारे अजित पवारच तेव्हाही अर्थमंत्री होते. मी त्यांच्याकडून शंभर कोटी रुपये शेतकऱ्यांना ‘अँडव्हान्स’ म्हणून देण्यासाठी मागितले. त्यांनीही ते दिले. सिंधुदुर्गच्या कलेक्टरांच्या खात्यात ते जमा होते.
आज याच विमानतळाच्या नावाने नाचणाऱ्यांनी त्यावेळी विरोध केल्यानं जमा झालेले शंभर कोटी परत गेले. आजही विकासकामं सुरु असतील तिथं जाऊन हेच लोक कंत्राटदारांकडून पैसे उकळतात. गाड्या घेतात. माझ्याकडं या सर्वाची व्यवस्थित माहिती आहे. पण या लोकांना धक्क्याला लावण्याची ही वेळ नाही. कोकणच्या विकासाला विरोध करण्याच्या या क्षुद्र प्रवृत्तीकडं आजच्या आनंदाच्या क्षणी मी दुर्लक्ष करतो.
सन २००९ ला भूमिपूजन झालं. त्यानंतर सातत्यानं पाठपुरावा करत राहिलो. मुंबई-दिल्ली वाऱ्या करुन पत्रं देत राहिलो. पण राजकीय विरोध चालूच होता. त्यावर मात करुन कासवगतीनं का होईना विमानतळाची कामं पुढं रेटत राहिलो. अखेर उद्घाटनासाठी २०२१ साल उजडावं लागलं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात माझा समावेश झाल्यानंतर मी तातडीनं मंत्रीमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. आमच्या पहिल्याच बैठकीत ९ ऑक्टोबर २०२१ ही चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली. कोकणवासीयांच्या उदंड प्रेमातून आणि सहकार्यातून ठरल्याप्रमाणं ते होईलही. आता काही तासातच चिपी विमानतळावरुन विमानं उडू लागतील.
पण मी इथं थांबणारा नाही. सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचं ‘सी वर्ल्ड’ही लवकरच होईल. त्याच जोडीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं ‘विजयदुर्ग’ आणि रेडी या दोन बंदरांनाही मी गती देणार आहे. दळणवळण, वाहतूक व्यवस्था यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते. विमानतळ, बंदरं ही नव्या जगातल्या नव्या अर्थव्यवस्थेतली आर्थिक विकासाची केंद्रं आहेत. याचं भान बाळगून त्या दिशेनं पावलं उचलणारा मी राज्यकर्ता आहे.
विकासाच्या कामात कोणी अडथळे आणू नयेत. कोकणात कोणी गरीब राहू नये असं मला मनापासून वाटतं. कोकणातल्या तरुणांना रोजगार मिळावेत, घरोघरी पैसा जावा ही माझी इच्छा आहे. त्याच्या आड कोणी येऊ नये. चालत्या गाडीला खीळ घालण्यापेक्षा एवढीच खुमखुमी असेल तर ‘सकारात्मक कर्तुत्त्व’ गाजवावं. हायवेपासून विमानतळापर्यंतच्या अप्रोच रोडसाठी ३४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ते अजून मिळालेले नाहीत. ते आणण्यासाठी विरोधकांनी कर्तुत्त्व दाखवावं. विमानतळाला एमआयडीसीनं वीज, पाणी पुरवणं गरजेचं आहे. ही कामं अजून अर्धवटच आहेत. तिथं लक्ष घालावं.
देशाचा मंत्री म्हणून मी कुठंही कमी पडणार नाही. सिंधुदुर्गात वर्षाला किमान पाच लाख पर्यटक यावेत यासाठी माझा प्रयत्न असेल. या दृष्टीनं माझ्याकडंच्या ‘एमएसएमई’ खात्याच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र, लहान-मोठे उद्योग, कारखाने केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात आणणार आहे. हे सगळं करताना माझ्या कोकणातलं अप्रतिम निसर्ग सौंदर्य, पर्यावरणाचीही योग्य काळजी घेईन. पण नुसतं जंगल टिकलं, वाढलं पण कोकणी माणूस उध्वस्त झाला, गरीब राहिला असंही व्हायला नको. हे संतुलन आपण सगळेजण मिळून राखुयात
१९९० मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला मोठ्या विश्वासानं मालवण-कणकवली मतदारसंघातून आमदारकी लढण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळी जे स्वप्न पाहिलं त्याचा गेली तीस वर्षं पाठपुरावा करत आलो. ते पूर्ण होतं असताना बाळासाहेबांचे शब्द मला आठवतात – ‘नारायण विकास झालाच पाहिजे.’ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर ‘विकासपुरुष’च आहेत. महिला, तरुण, गरीब हे त्यांच्या विकासनितीचा केंद्रबिंदू आहे. त्याचाच परिपाक म्हणून तीस वर्षांनी का होईना चिपी विमानतळावरुन आता विमानं उड्डाण घेणार आहेत. कोकणी माणसाच्या जागतिक स्वप्नांना नवं अवकाश खुलं होणार आहे. चला, माझ्या कोकणवासीयांना मी तुम्हाला साद घालतोय – एकमेकांच्या हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात !!!!
तुमचाच
नारायण राणे