
१३ विरुद्ध १२ च्या लढतीत सतेज पाटील यांच्या आघाडीचे बहुमत कायम
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या राजकीय थरारात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी तब्बल बारा तासांनंतरही संपत नव्हती. निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरही महायुतीच्या उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केल्याने मतमोजणी केंद्रावरील तणाव वाढला. अमर पाटील यांच्या फेरमतमोजणीत निकाल फिरला आणि त्यांचा विजय झाला. मात्र, त्यानंतर आणखी दोन उमेदवारांनी केलेले फेरमतमोजणीचे अर्ज फेटाळण्यात आले. अखेर १३ जागांसह सतेज पाटील यांच्या पॅनलने बहुमत मिळवले, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले.
गोकुळच्या २५ संचालकपदांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुती आणि सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीत चुरशीची लढत झाली. प्रत्येक फेरीतील आकडेवारीमुळे दोन्ही बाजूंची धाकधूक वाढत होती. सुरुवातीला सतेज पाटील यांच्या पॅनलचे पारडे जड असल्याचे चित्र होते. मात्र, महायुतीचे उमेदवार अमर पाटील यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि निकालाने अनपेक्षित वळण घेतले. फेरमतमोजणीनंतर अमर पाटील विजयी ठरले, तर सतेज पाटील यांच्या पॅनलचे सचिन घोरपडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालामुळे महायुतीच्या गोटात आणखी जागा मिळवण्याच्या आशा निर्माण झाल्या. त्यानंतर विश्वास आबाजी पाटील आणि युवराज पाटील यांनीही फेरमतमोजणीसाठी अर्ज केले.
वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद; दोन अर्ज फेटाळले
फेरमतमोजणीच्या अर्जांवरून दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष तीव्र झाला. सतेज पाटील यांच्या पॅनलच्या वकिलांनी अर्जांवर आक्षेप घेतला, तर महायुतीच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. या युक्तिवादानंतर दोन्ही उमेदवारांचे फेरमतमोजणीचे अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे महायुतीला आणखी जागा मिळवण्याच्या प्रयत्नांत यश आले नाही. दरम्यान, शौमिका महाडिक यांच्या मतांची दोन वेळा, तर युवराज बापू पाटील यांच्या मतांची तीन वेळा फेरमतमोजणी करण्यात आल्याची माहिती समोर आली. निकाल बदलण्याची शक्यता कायम असल्याने अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
१३ जागांचा मॅजिक फिगर; सतेज पाटील यांचे बहुमत कायम
गोकुळ दूध संघाच्या सत्तेसाठी १३ जागांचा आकडा निर्णायक होता. सतेज पाटील यांच्या आघाडीने हा आकडा गाठत बहुमत मिळवले. महायुतीला १२ जागा मिळाल्याने अवघ्या एका जागेच्या फरकाने सत्तेचे गणित ठरले. गोकुळवरील सत्ता ही कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ दूध संघाच्या सत्तासंघर्षापुरते न पाहता जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईच्या दृष्टीनेही पाहिले जात होते.
सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर उपस्थित
फेरमतमोजणीमुळे निकाल बदलण्याची शक्यता निर्माण झाल्याने सतेज पाटील स्वतः सायंकाळी पाच वाजल्यापासून मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधीही अंतिम निकालासाठी केंद्रावर थांबून होते. सर्व अर्जांवरील निर्णयानंतर निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. अमर पाटील यांच्या विजयामुळे महायुतीने एका जागेवर बाजी मारली; मात्र उर्वरित दोन अर्ज फेटाळले गेल्याने सतेज पाटील यांच्या आघाडीचे बहुमत कायम राहिले.
१३ विरुद्ध १२ अशा अटीतटीच्या निकालाने गोकुळचा सत्तासंघर्ष संपला. फेरमतमोजणीत एका जागेवर निकाल फिरला, पण अंतिम सत्तेचे गणित बदलण्यात महायुतीला यश आले नाही. अखेर सतेज पाटील यांच्या आघाडीने गोकुळचा गड राखला.







Subscribe to my channel






