
ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांचा विरोधकांना टोला
मालवण : माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मंजूर करून आणलेले आणि मालवण शहरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले भूमिगत वीजवाहिन्यांचे काम अद्याप रखडले आहे. नगरपरिषद सत्ताधारी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे काम प्रलंबित राहिल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केला आहे.
“विकासकामांवरून वैभव नाईक यांच्या नावाने टाहो फोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता भूमिगत वीजवाहिन्यांचे काम का रखडले, याचे उत्तर जनतेला द्यावे,” असे आव्हान बाबी जोगी यांनी दिले.
वैभव नाईक यांनी आमदार असताना मालवण शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला कायमस्वरूपी तोडगा मिळावा, तसेच पर्यटननगरी म्हणून मालवणचा विकास अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाने भूमिगत वीजवाहिन्यांचे काम मंजूर करून आणले होते. शहरवासीयांच्या हिताचा हा प्रकल्प राजकारण बाजूला ठेवून वेगाने पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र नगरपरिषद सत्तेत आल्यानंतर अनेक महिने उलटूनही या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही, असा दावा जोगी यांनी केला.
“देशात, राज्यात, जिल्ह्यात आणि मालवण नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांचीच सत्ता असताना शहरातील प्रत्येक प्रश्नाचे खापर वैभव नाईक यांच्या नावावर फोडले जाते. मग भूमिगत वीजवाहिन्यांचे काम कोणामुळे रखडले? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी जनतेसमोर द्यावे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मालवणला पर्यटनाच्या दृष्टीने राज्यात विशेष महत्त्व आहे. मात्र शहरातील वीजपुरवठ्याची समस्या अद्याप गंभीर असून अनेक वेळा नागरिकांना दोन-दोन, तीन-तीन दिवस वीजपुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जावे लागते. पर्यटन व्यवसायासह स्थानिक नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांचा प्रकल्प पूर्ण होणे ही शहराची तातडीची गरज असल्याचे बाबी जोगी यांनी म्हटले.
“मालवणच्या जनतेला राजकारण नको, तर दर्जेदार आणि अखंडित सुविधा हव्या आहेत. वीज हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. वैभव नाईकांच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आपल्या कारभाराचा हिशोब जनतेला द्यावा,” असा घणाघात जोगी यांनी केला. सध्या आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी व्यवस्था कार्यरत असतानाही मालवण शहरातील भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडणे ही सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता असल्याचा खोचक टोला बाबी जोगी यांनी लगावला. शहरातील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नावर तातडीने कार्यवाही करून भूमिगत वीजवाहिनीचे काम पूर्ण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.






Subscribe to my channel






