तामिळनाडू, केरळ, अंदमानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही “ब्ल्यू फ्लॅग बीच” पॉलिसी राबवणार
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती ; सिंधुदुर्गातील किनारपट्टीची निवड होणार
कुणाल मांजरेकर
मालवण : तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, ओडिशा, पोंडीचरी, गुजरात, अंदमान निकोबार या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही “ब्लू फ्लॅग बीच” संकल्पना राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मालवण येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ब्लू फ्लॅग बीच मुळे येथील समुद्र किनाऱ्याला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा दर्जा प्राप्त होणार असून यामध्ये सिंधुदुर्गातील किनारपट्टीचा समावेश होण्याचे संकेत पर्यटन मंत्र्यांनी दिले आहेत.
पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दुपारी मालवण बंदर जेटीची पाहणी केली. यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अरुण दुधवडकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, माजी नगरसेवक यतीन खोत, नागेंद्र परब, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, अमेय देसाई, तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिवसेनेचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ना. ठाकरे यांनी बंदर जेटीची पाहणी केली. यानंतर मालवण नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या मत्स्यालय व जैवविविधता माहिती केंद्राचे सादरीकरण मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही याबाबत पर्यटन मंत्र्यांना माहिती दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मालवणात येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे नवीन सुसज्ज जेटी उभारण्यात आली आहे त्यामुळे पर्यटकांना अधिक सुरक्षित सेवा उपलब्ध करून देता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून राज्य शासनाने येथील पर्यटन विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. येथील स्थानिक आमदार, खासदारांच्या माध्यमातून पर्यटन विकासाचे काम अधिक जलद गतीने करण्यात येईल. मालवण नगरपरिषदेच्या वतीने या ठिकाणी मत्स्यालय उभारणी केली जात आहे. याशिवाय सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात पंचतारांकित हॉटेलसाठी प्रयत्न सुरू असून त्याबाबत काही ठिकाणी प्रस्तावही प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी राज्य शासनाने आखलेल्या टुरिझम पॉलिसी अंतर्गत हॉटेल साठी लागणाऱ्या आवश्यक ८० परवानग्यांची संख्या आता १० वर आणण्यात आली आहे. त्यामुळे येथे पर्यटन विकास मोठ्या प्रमाणात घडू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्रपतींचे किल्ले म्हणजे आमच्यासाठी मंदिरे !
येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. महाराजांचे गड किल्ले म्हणजे फक्त किल्ले नाहीत. तर आमच्यासाठी मंदिरे आहेत. आमचे ते प्रेरणास्थान आहे. त्यामुळे हा वारसा पुढे नेण्यासाठी राज्य शासनाचे काम सुरू आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सिंधुदुर्गातील निवास न्याहारी आणि कृषी पर्यटनातील समस्यांवर पर्यटन विभागाचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.