मालवण : शहरातील धुरीवाडा परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात मालवण पोलिसांनी रात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३ लाख ४५ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी आनंद भालचंद्र मुणगेकर (रा. कोतेवाडा, मालवण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुरीवाडा परिसरात गोवा बनावटीच्या दारूची अवैध साठवणूक आणि विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत पोलिसांनी रात्रीच्या वेळी संबंधित ठिकाणी छापा टाकत कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले, हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, सुप्रिया पवार आणि वृषाली पाटील यांनी सहभाग घेतला. अशा गैरकृत्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.