स्व. संजय नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पेंडूरमध्ये विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण

मालवण : स्व. मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ‘संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान, पेंडूर’, ‘संजय नाईक मित्र मंडळ’ व ‘नाईक कुटुंबीय’ यांच्या संयुक्त विद्यमाने पेंडूर गावात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

यावर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, या सामाजिक जाणिवेतून पेंडूर गावातील सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ जि. प. प्राथमिक शाळा पेंडूर क्र. १, पेंडूर क्र. २, शाळा सोनारवाडी, शाळा खरारे, शाळा पराड, शाळा मोगरणे तसेच या सर्व शाळांच्या परिसरातील अंगणवाड्यांतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना झाला.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. संजय नाईक यांच्या प्रेरणास्थळी उभारलेल्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. याच प्रसंगी प्रेरणास्थळ परिसरात सोनचाफ्याचे सुगंधी रोप लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. स्व. संजय नाईक यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा सुगंध आजही समाजात दरवळत आहे, त्याचेच प्रतीक म्हणून हे सोनचाफ्याचे रोप लावण्यात आले. आगामी काळात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रतिष्ठानच्या वतीने व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ. सोमनाथ परब यांनी स्व. संजय नाईक यांच्या शैक्षणिक, सामाजिक व लोकाभिमुख कार्याचा आढावा घेत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांनी स्व. संजय नाईक यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा व समाजोपयोगी संकल्प उपस्थितांसमोर मांडले. “त्या सर्व संकल्पांची पूर्तता करण्यासाठी संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान सदैव कटिबद्ध राहील,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी विविध शैक्षणिक, सामाजिक व लोकहिताचे उपक्रम राबविले जात असून, स्व. संजय नाईक यांच्या सेवाभावी कार्याचा वारसा जतन करून तो अधिक व्यापक करण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.यावेळी संदेश नाईक, श्रावणी नाईक, नेहा परब सरपंच, स्वप्नील मेस्त्री पोलिस पाटील, गीता नाईक, संदीप नाईक, श्रेया नाईक, राजन नाईक, अमित सावंत, प्रदीप आवळेगावकर, दीपा सावंत, सुमित सावंत, प्रकाश सरमाळकर, निलेश हडकर, शेखर फोंडेकर, सुशील राणे, अनिल पाटील, अजित वालावलकर, न्हानू पेंडूरकर, पिंटू वालावलकर, दादा वायंगणकर, सतीश पाटील, अश्विनी पेडणेकर, संतोष हिंदळलेकर, आतिक शेख, सलीम शेख, गजानन सावंत तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, नाईक कुटुंबीय आणि पेंडूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!