कणकवली : पाऊस एकाकी गायब झाल्याने मळयात भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकरी सध्या इकडून तिकडून पाणी आणून लावणी उरकत आहे. पण पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील विविध भागात जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला लागली आहेत. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथे शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी कृषी अधिकाऱ्यांना सुचना देऊन शासनाच्या माध्यमातून विशेष मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी तहसीलदार रिक्षांची देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उप कृषिअधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रविण ओहळ, मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव, ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी पेडणेकर, कृषी सेवक गजानन पवार, डॉ विजय कुमार शेटये, पोलिस पाटील चंद्रकांत चव्हाण, मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, वैभववाडी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे आदी उपस्थित होते.