
स्मार्ट मिटर वाढीव बिल, वीज समस्या, इन्सुलेटेड वायर बसवणे आदी विषयांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी
मालवण : वीज वितरण कंपनीच्या विविध समस्यांप्रकरणी युवासेना सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी मालवणात वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हे प्रश्न सोडवण्याची मागणी केली. यात प्रामुख्याने स्मार्ट मिटर वाढीव बिल, वीज समस्या, इन्सुलेटेड वायर बसवणे आदी विषयाचा समावेश होता. यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम सुधीर साळसकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी यांनी मालवण वीज वितरण कार्यालय येथे वीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, उपविधानसभा प्रमुख संकेत राऊळ, जिल्हा सचिव राहुल बागवे, मालवण तालुकाप्रमुख अभी लाड, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, निकीत वराडकर, मालवण तालुका सचिव तथागत मालवणकर, योगेश कामतेकर, आचरा विभाग प्रमुख उमेश सावंत, अमोल मुळीक, मंगेश साळसकर, संदीप राणे, शाम घाडी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मालवण शहर परिसर व किनारपट्टी भागात प्रामुख्याने अनेक वीज खांब, वीज तारा व वीज साहित्य जीर्ण झाले आहे. काही ठिकाणी तारा तुटून पडतात. तरी याचा सर्वे होऊन आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून इन्सुलेटेड वीज वायर बसवण्यात याव्यात अशीही मागणी यावेळी युवा सेना पदाधिकारी यांनी केली. विविध विषयावर झालेल्या या चर्चेत वीज वितरणचे अधिकारी उपकार्यकारी अभियंता सचिन मेहत्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मालवण तालुक्यात अनेक ठिकाणी नवीन स्मार्ट वीजमीटर बसवण्यात आल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. अनेक ग्राहकांचा वीज वापर पूर्वीइतकाच असूनही त्यांच्या वीज बिलामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम, आर्थिक असह्य आणि असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांच्या प्रश्नांची तातडीने गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आली. यासोबतच अन्य वीज समस्या बाबत वीज अधिकारी यांचे लक्ष वेधुन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.





Subscribe to my channel






