भाग्यविधाते सिंधूभूमीचे, सामर्थ्य हिंदभूमीचे !
कुणाल मांजरेकर
दातृत्व, कर्तृत्व, आणि नेतृत्व याचं दुसरं नाव म्हणजे नारायण तातू राणे अर्थात कोकणचे लाडके 'दादा'... महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही ठराविक नेत्यांनी आपला ठसा उमटविलाय, त्यामध्ये नारायणरावांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. शिवसेनेत असताना कॅबिनेटमंत्री, मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांसारखी महत्वाची पदे भूषवलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेत उद्धव ठाकरेंशी बिनसल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस मध्ये देखील महसूलमंत्री, उद्योगमंत्री यांसारख्या विविध पदांवर काम केलेल्या नारायण राणेंचा २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर "राणे संपले" अशी आरोळी अनेकांनी ठोकली. मात्र त्यानंतर स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजप मध्ये विलीन केल्यानंतर महाराष्ट्रात रमलेल्या नारायण राणेंना भाजपने दिल्लीत राज्यसभेची खासदारकी बहाल केली आहे. साधारण आठ महिन्यांपूर्वी राणेंची थेट केंद्रीयमंत्री पदावर वर्णी लावून देशाच्या आर्थिक जडणघडणीमध्ये जवळपास ३० टक्के वाटा असलेल्या केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार राणेंकडे देण्यात आला आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा श्रेष्ठींनी राणेंच्या कार्यकर्तृत्वावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे राणे संपले म्हणणाऱ्यांच्या कानाखाली नियतीने मारलेली ही चपराक असून आज राज्यासह राष्ट्रीय राजकारणात राणेंचा दबदबा वाढला आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेतलेल्या नारायण राणेंचा आज ७१ वा वाढदिवस ... यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा....
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नारायण राणेंनी स्वतःच्या कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय. नारायणराव आज कोणत्याही पक्षात असले तरी ते आजही स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले कडवट शिवसैनिकच आहेत. जे करायचं ते बेधडक हा त्यांचा स्वभाव. अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वभावातील गुण नारायणरावांमध्ये पाहायला मिळतात. १९९० चा तो काळ आणि त्या काळाने पाहिलेले नारायण राणे कोणीही विसरू शकणार नाही. मुंबईत बेस्ट समितीचे चेअरमन असलेले नारायण राणे कोकणात आले कधी आणि संपूर्ण कोकणला त्यांनी आपलंसं केलं कधी, हे कुणाला कळलं देखील नाही. ज्या कोकणात राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग म्हणजे खड्डयांचं जाळं होतं, साकव तर सोडा, साधं गावांमध्ये जाण्यासाठी पायवाट नव्हती, त्या कोकणचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचं काम नारायण राणेंनी केलं. ज्या कोकणात रोजगार नाही, नोकरी नाही म्हणून इथल्या अनेक मुलांनी नोकरीसाठी मुंबईचा रस्ता पकडला, त्या कोकणात आज पर्यटन उद्योगाचं जाळं निर्माण झालंय. त्यातून हजारो युवकांना रोजगार नाय. कोकणचं अर्थकारण, जीवनमान बदलून गेलंय. आणि या सर्वांच श्रेय जातंय ते फक्त आणि फक्त नारायण राणे यांना आणि त्यांच्या दूरदृष्टीपणाला.. !!
१९९५ मध्ये नारायण राणे दुसऱ्यांदा आमदार बनले त्याचवेळी राज्यात शिवसेना- भाजपचं युती सरकार सत्तेवर आलं होतं. त्यावेळी कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळालेल्या नारायण राणेंनी मागे वळून पाहिलं नाही. दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, महसूल आदी महत्वाच्या खात्यांचा कार्यभार स्वीकारताना प्रत्येक खात्याचा माझ्या कोकणी माणसाला कसा फायदा मिळेल, यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं. राणेंच्या कार्यतत्परतेचं आणि अभ्यासूपणाचं फळ म्हणून १९९९ च्या फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पदावरून पायउतार केल्यानंतर त्यांच्या जागी कोकणचे सुपूत्र असलेल्या नारायण राणे यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली. नारायण राणे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. मात्र या आठ महिन्यातील प्रत्येक क्षणाचा कोकणला फायदा करून देण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. जर राणेंना मुख्यमंत्री पदी आणखी संधी मिळाली असती तर कोकण मुंबई, पुण्यासारख्या महानगराच्या तुलनेत तसूभरही मागे राहिला नसता. शिवसेनेत उद्धव ठाकरेंशी बिनसल्याने राणेंनी २००५ मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसचा हात धरला. काँग्रेस मध्ये प्रवेश करताच त्यांना महसूलमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणे विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी विजयी सभेसाठी मालवणात दाखल झाल्या होत्या. यातून राज्याबरोबरच राष्ट्रीय राजकारणात राणेंच्या नावाला किती वजन होतं, हे दिसून येतं. राणेंचा स्वभाव तसा आक्रमक असल्याने काँग्रेस सारख्या मवाळ पक्षात ते जास्त काळ रमले नाहीत. काँग्रेस पक्षाचा त्याग करून त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन केला. त्यानंतर नारायण राणे यांची भाजपने राज्यसभा खासदार म्हणून वर्णी लावली. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार केला. यावेळी नारायण राणेंची केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रीपदी वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात कार्यरत असलेल्या राणेंची राष्ट्रीय राजकारणात नवीन इनिंग सुरू झाली आहे.
नारायण राणेंनी राजकारणात अफाट यश मिळवलं आहे. मात्र त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांची जिद्द आणि चिकाटीपणा दुर्लक्षून चालणार नाही. शिवसेना आज कॉर्पोरेट पक्ष बनला आहे. अगदी मुंबईचा शाखाप्रमुख देखील आज सत्तेच्या जीवावर तोऱ्यात वावरताना दिसून येतो. पण १९९० च्या दशकात शिवसेनेचं फार वेगळं रूप मुंबईकरांनी पाहिलं होतं. बाळासाहेब ठाकरे याचं नेतृत्व लाभलेली शिवसेना म्हणजे संघर्ष, त्याग आणि विश्वास ही त्यावेळच्या शिवसेनेची ओळख होती. आणि ही ओळख मिळवून दिली होती, नारायण राणे यांच्यासारख्या बाळासाहेबांच्या कडवट आणि निष्ठावंत सैनिकांनी… त्यावेळी दाऊद पासून स्वर्गीय बाळासाहेबांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी स्वतः नारायण राणे बाळासाहेबांच्या संरक्षणासाठी निवडक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पहारा देत होते.
नारायणरावांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेत. ज्या कोकणसाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं, त्या कोकणी जनतेने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांना, तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतः नारायणरावांना पराभव पहायला लावला. हे दोन्ही पराभव म्हणजे राणेकुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. या पराभवामुळे नारायणराव दुःखी झाले पण खचले नाहीत. कारण खचून जाणं हा मुळात राणेसाहेबांचा स्वभावगुण नाही. कोकणी माणसाविषयी असलेली त्यांची तळमळही काही कमी झाली नाही. जिल्ह्यात आरोग्य सुविधांची उणीव लक्षात घेऊन ओरोस नजिक पडवे गावात त्यानी अत्याधुनिक सोयींनी सज्ज असे लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारणीचा संकल्प केला. हे हॉस्पिटल उभारताना वेगवेगळ्या समस्या त्यांच्या समोर आल्या. पण ते खचले नाहीत, डगमगले नाहीत. उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं हॉस्पिटलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. त्याचं फळ म्हणून आज पडवे सारख्या माळरानावर लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज मोठ्या दिमाखात सुरू आहे. आज संपूर्ण कोकणात एवढं प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेलं दुसरं हॉस्पिटल नाही. हे हॉस्पिटल त्यांनी मुंबई, पुणे सारख्या शहरात सुरू केलं असतं तर त्यातून त्यांनी करोडो रुपये मिळवले असते. मात्र ज्या सिंधुदुर्गच्या जनतेने त्यांना आणि त्यांच्या थोरल्या मुलाला पराभव दाखवला, त्या सिंधुदुर्गकरांसाठी हे हॉस्पिटल त्यांनी पडवे सारख्या ग्रामीण भागात उभं केलं आहे. आज सिंधुदुर्गात आरोग्य, शिक्षणाची सर्व दालने राणेसाहेबांनी खुली करून दिली आहेत.
आज १० एप्रिलला राणे साहेबांचा ७० वा वाढदिवस होत असून राणेसाहेब ७१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने कोकणच्या या लाडक्या ‘दादा’ माणसाला कोकण मिरर परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा !!