काळाने घात केला! महामार्गावरील भीषण अपघातात भूषण कुडाळकरांचा दुर्दैवी अंत

कुडाळ आंबेडकरनगरवर शोककळा

कुडाळ : नियतीचा घाला कधी, कुठे आणि कसा पडेल, याचा नेम नाही! हसतं-खेळतं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त करणाऱ्या एका भीषण अपघाताने कुडाळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लेमनग्रास हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने भूषण सुरेश कुडाळकर (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कुडाळ) यांचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला भूषण यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र गंभीर दुखापतीमुळे भूषण यांचा जागीच मृत्यू झाला होता.

वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षी काळाने भूषण यांच्यावर झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काही क्षणांपूर्वी सुरू असलेला जीवनप्रवास अचानक संपल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका व्यक्तीच्या जाण्याने कुटुंबीयांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. भूषण यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसर शोकसागरात बुडाला असून, या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!