
आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ यांच्यासह प्रमुख नेत्यांवर जबाबदारी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मुंबई | प्रतिनिधी : विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या विविध राजकीय मुद्द्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने आता विशेष रणनीती आखली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आणि पक्षाची भूमिका ठामपणे जनतेसमोर मांडण्यासाठी प्रमुख नेत्यांची विशेष टीम सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विविध राजकीय मुद्द्यांनुसार अनुभवी नेत्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून, विरोधकांच्या आरोपांना तत्काळ प्रत्युत्तर देण्यासोबतच भाजपची भूमिका आक्रमकपणे मांडण्यावर भर देण्यात येणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार संजय कुटे यांच्यावर विरोधकांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर देत पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
महिला मतदारांशी संबंधित तसेच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ आणि आमदार देवयानी फरांदे यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर युवा चेहरा म्हणून आमदार विक्रम पाचपुते आणि आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन हे विविध राजकीय मुद्द्यांवर पक्षाची भूमिका मांडणार आहेत.
आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांना प्रत्युत्तर देणे, पक्षाची भूमिका स्पष्ट करणे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा या रणनीतीचा प्रमुख उद्देश असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम आगामी काळात विविध मुद्द्यांवर सक्रिय राहणार असून, विरोधकांच्या आरोपांना तत्काळ उत्तर देण्याची भाजपची तयारी या बैठकीतून स्पष्ट झाली आहे.







Subscribe to my channel






