पाणीटंचाईच्या संकटावर सॉफ्टलॅब्स ग्रुपचा पुढाकार

‘sindhudurg.ai’च्या माध्यमातून AI, GPS आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर

मालवण | कुणाल मांजरेकर

यंदा कोकणात पावसाने ओढ दिल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधील काही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात वाहून जाते. त्यामुळे फेब्रुवारी ते मे दरम्यान पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता असून, आजपासूनच पाणी बचत आणि जलसंधारणाची उपाययोजना करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर सॉफ्टलॅब्स ग्रुपने ‘sindhudurg.ai’ या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील दुष्काळ व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाची जोड देण्याचा पुढाकार घेतला आहे.

नागरिकांनी पाण्याची गळती थांबवणे, वापरलेले पाणी बागेसाठी वापरणे, पिण्याचे पाणी झाकून ठेवणे आणि टँकरचे पाणी उकळून घेणे, असे आवाहन करण्यात आले आहे. गावागावांत पाणी समित्या स्थापन करून वनराई बंधारे बांधणे, जुन्या तलावांचा गाळ काढणे आणि पावसाचे पाणी अडवणे यावर भर देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पंचनाम्यावेळी शेतात उपस्थित राहणे, ई-पीक पाहणीत पिकांची नोंद करणे, बागेत आच्छादन करणे आणि ठिबक सिंचनाचा वापर करणे आवश्यक आहे.

‘sindhudurg.ai’च्या माध्यमातून AI आणि उपग्रह तंत्रज्ञानाने पिकांची स्थिती तपासणे, जिओटॅग फोटो व जमिनीच्या नोंदींची पडताळणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना मदत थेट बँक खात्यात देण्याची डिजिटल व्यवस्था उभारण्याची संकल्पना आहे. विहिरींवर सेन्सर बसवून पाण्याची पातळी कळविणे, प्रत्येक टँकरवर GPS बसवून त्याच्या हालचालीवर नजर ठेवणे आणि सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या मालवण येथील नियंत्रण कक्षातून संपूर्ण जिल्ह्यावर देखरेख ठेवणे, अशीही या उपक्रमाची दिशा आहे.

लाभार्थी यादी ग्रामसभेत जाहीर करण्यासोबतच नागरिकांना WhatsApp वर मराठीत अर्जाची स्थिती तपासता यावी, यासाठीही डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. पाणी वाचवा, जलस्रोत जपा आणि आजपासूनच तयारी करा, तंत्रज्ञान आणि लोकसहभागातून सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करूया, असा संदेश सॉफ्टलॅब्स ग्रुप – sindhudurg.ai या उपक्रमातून देण्यात आला आहे.

error: Content is protected !!