
“सेवाभावाला केलेला हा मानाचा मुजरा” – विशाल परब; सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन
सावंतवाडी : कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते जपताना उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पडद्यामागे अहोरात्र मेहनत घेणाऱ्या गणेश मूर्तिकारांपासून भजनी कलाकार, गायक, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, डेकोरेटर्स आणि विविध सेवाव्रतींचा सावंतवाडीत नागरी सत्कार करण्यात आला.
सावंतवाडी नागरी कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘श्री गणेशोत्सव २०२६’ निमित्त या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर आणि जि. प. सदस्य संदीप गावडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी विशाल परब यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या सेवाव्रतींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “गणेशोत्सवाची भव्यता केवळ सजावटीत किंवा रोषणाईत नसते; त्यामागे असंख्य हातांचे कष्ट, भक्ती आणि समर्पण असते. या पडद्यामागील शिलेदारांचा सन्मान म्हणजे त्यांच्या सेवाभावाला केलेला मानाचा मुजरा आहे.” समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा सावंतवाडी नागरी कृती समितीचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. “सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक घटकाने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. शहराच्या विकासासाठी सकारात्मक विचाराने आणि एकजुटीने पुढे जाऊया,” असे आवाहनही विशाल परब यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला नगरसेविका दिपाली भालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष नितीन नाईक, माजी नगरसेवक कीर्ती बोंद्रे, नगरसेवक अजय गोंदावळे, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष बापू सावन, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, माजी नगरसेवक उमाकांत वारंग आणि नगरसेविका दिव्या सूर्याजी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सावंतवाडी नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर, उपाध्यक्ष ॲड. राजू कासकर, सरचिटणीस श्रीपाद सावंत तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोकण आणि गणेशोत्सवाचे नाते केवळ श्रद्धेचे नाही; ते संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याचेही आहे. गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी मूर्तिकारांपासून सफाई कामगारांपर्यंत असंख्य हात निःस्वार्थपणे झटत असतात. अशा खऱ्या शिलेदारांचा सन्मान करून त्यांना प्रकाशझोतात आणण्याचे काम सावंतवाडी नागरी कृती समितीने केले आहे.







Subscribe to my channel






