
मुंबई-सावंतवाडी नियमित एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा ; हजारो चाकरमान्यांना दिलासा
मुंबई : खासदार नारायण राणे आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई-कोकण रेल्वेसेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. रेल्वे प्रवाशांची वर्षानुवर्षांची मागणी… राणे पिता पुत्रांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे कोकण वासियांची स्वप्नपूर्ती झाली असून मुंबई आणि कोकणाला जोडणाऱ्या आणखी एका नियमित रेल्वेसेवेचा शुभारंभ गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान ही नियमित एक्सप्रेस धावणार आले. यामुळे मुंबईत वास्तव्यास असलेल्या हजारो कोकणवासीय चाकरमान्यांसाठी ही रेल्वेसेवा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या या विशेष शुभारंभ सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मत्स्य व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोहळ्यात सहभाग घेतला.
गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि परतीच्या प्रवासासाठी १५०८८ सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस अशी ही रेल्वेसेवा दररोज धावणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
चाकरमान्यांसह पर्यटनालाही बळ
मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांसाठी ही नियमित सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक तसेच पर्यटकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी आणि अन्य सण-उत्सवांच्या काळात कोकणात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नियमित एक्सप्रेसची उपलब्धता प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. रेल्वेसेवेमुळे मुंबई-कोकण प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच कोकणातील पर्यटन, हॉटेल व्यवसाय, स्थानिक व्यापार आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
पाठपुराव्याला मिळाले फलित
मुंबई आणि कोकण यांच्यातील दळणवळण अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही रेल्वेसेवा महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोकणवासीयांची अनेक वर्षांची मागणी प्रत्यक्षात आली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कोकणच्या विकासाच्या वाटचालीत ही नवी रेल्वेसेवा महत्त्वाची ठरणार असून, ‘मुंबई ते कोकण’ प्रवासाला आता आणखी एक वेगवान आणि नियमित पर्याय मिळाला आहे.







Subscribe to my channel






