मालवणात २३ जानेवारी पासून रंगणार देवतांचा ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळा

आई भवानी माता-छत्रपती शिवाजी महाराज-देव रामेश्वर यांची होणार भेट ; देवस्थानकडून कार्यक्रमाची रुपरेषा जाहीर

मालवण : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया, आदिशक्ती भवानी माता आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक, पारंपरिक त्रैवार्षिक किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर आपल्या इतर वारेसुत्र, पालखी, तरंग, राणे, परब मानकरी, गावघर व स्थत मंडणासह किल्ले सिंधुदुर्ग, मालवण येथे शुक्रवार २३ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. कांदळगाव येथून रवाना होणार आहेत. या ऐतिहासिक, देदीप्यमान भेट सोहळ्यात सहकुटुंब सहभागी होऊन या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ, कांदळगाव ग्रामस्थांनी केले आहे.

२३ रोजी सकाळी ८ वा. देव रामेश्वर आपल्या पंचायतन, वारेसुत्र, पालखी, तरंग व भाविक रयतेसह मालवण जोशी मांड येथे मार्गस्थ होणार. दुपारी १२ वा. जोशीमांड मेढा, मालवण येथे उपस्थितांना अल्पोपहार, नंतर समुद्रमार्गे होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे प्रवास. पुढे किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात देव रामेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासीक भेट सोहळा. पुढे भवानी माता मंदिर येथे श्री देव रामेश्वर आणि आदीमाया, आदिशक्ती आई भवानी यांचा भेट सोहळा. नंतर रितीरिवाजाची कामे. सायं. ४ वा. किल्ले सिंधुदुर्ग येथून दांडेश्वर मंदिर, दांडी येथे होडीतून परतीचा प्रवास. दांडी मालवण येथे पोहोचल्यावर सर्व भाविकांना दांडी गावातर्फे चहापाणी आणि थंडगार शितपेय वाटप. नंतर तेथून मौनीनाथ मंदिर-मेढा मालवणच्या दिशेने मार्गक्रमण, रात्री मौनीनाथ मंदिरात पोहोचल्यावर त्या दिवसाची सांगता. पालखीचा तेथे मुक्काम, उपस्थित सर्वांसाठी मौनीनाथ मंदिर व कुशेवाडा येथे महाप्रसाद होणार आहे.

शनिवार २४ रोजी सकाळी ८ वा. मौनीनाथ मंदिरात पारंपरिक विधीवत पूजा-अर्चा झाल्यानंतर माविकांना आशीर्वचन देऊन श्री देव रामेश्वर आणि सर्व वारेसुत्र, पालखी, तरंग पुढे कुशेवाडा येथे मार्गस्थ होतील. कुशेवाडा येथे पोहोचल्यावर प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबियांना पारंपरिक भेट व आशीर्वचन देऊन रितीरिवाजाची कामे पूर्ण करून पालखी पुढे रामेश्वर मांड, मालवण बाजारपेठ येथे मार्गस्थ होईल. दुपारी १ वा. रामेश्वर मांड, बाजारपेठ येथे भाविकांना दर्शन व आशीर्वचन, त्यानंतर रामेश्वर मांड मंडळातर्फे उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी आणि भंडारी हायस्कूलच्या पाठीमागील हॉलमध्ये भाविकांना महाप्रसादाचे आयोजन. तेथून रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर, कांदळगावला परतीचा प्रवास. सायं. ४ नंतर, रात्री ८ वा. देव महापुरुष देवस्थान (मांगरी) कोळंब येथे पालखी, तरंग यांचे त्या दिवसासाठी विसर्जन आणि मुक्काम. नंतर गणेश (अवि) नेरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन. नंतर कांदळगावला जाणाऱ्या भाविकांसाठी नेरकर यांच्यामार्फत मोफत वाहनांची सोय करण्यात आली आहे.

रविवार, २५ रोजी दुपारी १ वा. व रात्री १० वाजता कोळंब महापुरुष देवस्थान येथे महाप्रसाद, नंतर आशीर्वचन देऊन देव रामेश्वर, इतर वारेसुत्र, पालखी, तरंग, भाविक आणि गावघर, कांदळगाव स्वगृही परतीच्या प्रवासाला निघणार. वाटेत आशीर्वचन देत देत रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथे या ऐतिहासीक तीन दिवसीय सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, कांदळगाव, मानकरी व ग्रामस्थांनी दिली आहे.

error: Content is protected !!