जेएसडब्ल्यू मायनिंग विरोधी आंदोलन : वैभव नाईक मध्यरात्री ग्रामस्थांच्या भेटीला

आजगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाला दिला पाठींबा

सावंतवाडी : आजगाव दशक्रोशीमध्ये जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाच्या होत असलेल्या सर्वेक्षणाला सोमवारी रात्री तेथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत जनआंदोलन छेडले. याची माहिती मिळताच रात्री १२ वाजता माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी श्री वेतोबा मंदिर येथे भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हापरिषद सदस्य संजय गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार व आजगाव ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध मायनींग सुरु आहे. याची तक्रार आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील केली आहे. जनसुनावणी न घेता सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर रित्या जमिनीत उत्खनन केले जात आहे. आजगाव येथे अशाच पद्धतीने सत्तेतील नेत्यांच्या आशीर्वादाने जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाचे सर्वेक्षण केले जात असताना ग्रामस्थांनी विरोध करून ते रोखले त्याबद्दल येथील जागरूक ग्रामस्थांचे मी कौतुक करतो. बेकायदेशीरपणे केले जाणारे उत्खनन बंद झालेच पाहिजे अशी आमचीही भूमिका आहे.त्यामुळे आजगाव ग्रामस्थांच्या भूमिकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा आहे. इतर भागातील नागरिकांनीही अशीच आंदोलने उभी केली पाहिजेत. आंदोलनात ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू अशी ग्वाही वैभव नाईक यांनी यावेळी दिली.

error: Content is protected !!