
९ आणि ११ सप्टेंबरला मुंबईहून कोकणात धावणार विशेष रेल्वे; दादरहून सकाळी १०.३० वाजता सुटणार
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबईतील चाकरमान्यांना आता कोकणच्या गावाची ओढ लागली आहे. याच चाकरमान्यांच्या आनंदात आणखी भर घालत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यंदाही ‘मोदी एक्स्प्रेस’ची घोषणा केली आहे. गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकर चाकरमान्यांना कोकणातील त्यांच्या गावापर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाची परंपरा यंदाही कायम राहणार आहे.
९ आणि ११ सप्टेंबर रोजी ‘मोदी एक्स्प्रेस’ मुंबईहून कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी १०.३० वाजता ही विशेष रेल्वे सुटेल. रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली मार्गे ही रेल्वे सावंतवाडीपर्यंत धावणार आहे.
चाकरमान्यांच्या सेवेसाठी नितेश राणेंचा पुढाकार
गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा, यासाठी ‘मोदी एक्स्प्रेस’मध्ये पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरवर्षी रेल्वेतून चाकरमान्यांना निरोप देताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान हेच या उपक्रमाचे मोठे समाधान असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि कोकणातील चाकरमान्यांमध्ये भावनिक नाते जोडणाऱ्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो. त्यामुळे यंदाच्या ‘मोदी एक्स्प्रेस’कडेही चाकरमान्यांचे लक्ष लागले आहे.
२ ते ५ सप्टेंबरदरम्यान बुकिंग
‘मोदी एक्स्प्रेस’च्या प्रवासासाठी २ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या कालावधीत तिकीट बुकिंग करता येणार आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील भाजप मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरीचा थांबा असल्याने रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
गणपती बाप्पाच्या जयघोषात चाकरमान्यांची कोकणवारी!
मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून काही दिवस आपल्या मातीच्या गावात, आपल्या माणसांमध्ये आणि गणपती बाप्पाच्या चरणी घालविण्यासाठी हजारो चाकरमानी दरवर्षी कोकणात दाखल होतात. यंदाही नितेश राणेंच्या पुढाकारातून ‘मोदी एक्स्प्रेस’मधून नाचत-गाजत गावाकडे जाण्याची चाकरमान्यांची तयारी सुरू झाली आहे.
“चला, यंदाही आपल्या हक्काच्या ‘मोदी एक्स्प्रेस’मध्ये बसून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या गावाकडे जाऊया!” असा उत्साहपूर्ण संदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी चाकरमान्यांना दिला आहे.






Subscribe to my channel






