कृष्णापटणमच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंदरांना नवी झेप

मंत्री नितेश राणेंची अदानी पोर्टला ‘ग्राऊंड व्हिजिट’; अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्गो हाताळणी आणि गुंतवणुकीच्या मॉडेलचा थेट अभ्यास

कृष्णापटणम (आंध्र प्रदेश) : महाराष्ट्राच्या बंदर विकासाला आता आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या व्यवस्थापनाची जोड देण्याच्या दिशेने मोठी पावले पडत आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशातील कृष्णापटणम येथील अदानी पोर्टची प्रत्यक्ष पाहणी करत अत्याधुनिक बंदर व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. या अभ्यासदौऱ्यातून महाराष्ट्रातील बंदर विकासाला नवी दिशा देण्याचे संकेत मिळाले आहेत.

कृष्णापटणम बंदरातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कार्गो हाताळणी व्यवस्था, खोल पाण्यातील जहाजांसाठी उपलब्ध सुविधा, यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याची मंत्री राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बंदराचे दैनंदिन कामकाज अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी कोणत्या आधुनिक पद्धती वापरल्या जातात, याचीही माहिती त्यांनी घेतली.

महाराष्ट्राच्या मोठ्या समुद्रकिनाऱ्याला विकासाची नवी ताकद देण्यासाठी बंदर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने उद्योगांसाठी मंजुरी प्रक्रिया सुलभ करणे, गुंतवणुकीतील अडथळे दूर करणे आणि बंदरांभोवती सक्षम औद्योगिक व लॉजिस्टिक्स परिसंस्था उभारणे, यावरही यावेळी चर्चा झाली.

बंदर विकासासोबत जहाजबांधणी, लॉजिस्टिक्स, रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विस्ताराला चालना देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर मंत्री राणे यांनी भर दिला. कृष्णापटणममध्ये यशस्वी ठरलेल्या कार्यपद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी उपयुक्त मॉडेल स्वीकारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील बंदरांना केवळ समुद्री वाहतुकीची केंद्रे न ठेवता ती उद्योग, व्यापार आणि रोजगारनिर्मितीची शक्तिशाली केंद्रे बनविण्याच्या दिशेने हा अभ्यासदौरा महत्त्वाचा ठरणार आहे. यावेळी कृष्णापटणम पोर्टचे CEO जगदीश पटेल, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे CEO प्रदीप पी., मुख्य बंदर अधिकारी प्रवीण खरा, कार्यकारी अभियंता मनिष मेटकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!