मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत हेदूळ पुजारेवाडीतील गरीब आणि गरजू कुटुंबांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. ऐन अडचणीच्या काळात मनसेकडून मिळालेल्या या मदतीमुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या साहित्याच्या वाटपप्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर आणि तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना साहित्याचे वितरण करण्यात आले.
वाडीतील अत्यंत गरजू असलेल्या रेश्मा राऊळ, दर्शना सावंत, लता पाटकर, वर्षा परुळेकर, तन्वी हेदूळकर, श्रीराम पुजारे, मोहन हेदळकर, रविकांत हेदळकर, समीर घाडी या कुटुंबांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
मनसे सदैव जनतेच्या सुख-दुःखात धावून जाण्यासाठी तत्पर असते. हेदूळ पुजारे वाडीतील गरजू कुटुंबांना छोटीशी मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे मत याप्रसंगी मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल पुजारेवाडीतील ग्रामस्थांकडून आभार मानले जात आहेत.