मालवण शहरातील दागिने चोरी प्रकरणी अटक संशयितांना पोलीस कोठडी

सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. नितीन कुंटे यांनी बाजू मांडली ; फिर्यादीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व सोनाली कुबल यांनी सरकार पक्षास केले सहाय्य

मालवण : मालवण येथील राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयावरुन दाखल गुन्ह्याचे तपासाकरीता अटक संशयीत अमृता अमर म्हापणकर (रा. कुंभारमाठ ता.  मालवण) व राघो सूर्यकांत राऊत (रा. सुकळवाड ता. मालवण) यांना  मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी पाच दिवसांची पोलिस  कोठडी सुनावली.  याकामी सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. नितीन कुंटे यांनी बाजू मांडली व मुळ फिर्यादीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व सोनाली कुबल यांनी सरकार पक्षास सहाय्य केले. 

दि. 17/01/2026 रोजी मालवण येथील समर्थ कृपा संकुलातील फिर्यादी महिलेच्या राहत्या घरातील मंगळसुत्रासहित सोन्याचे दागिने कपाटातून नाहीसे झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीच्या घरात आलेल्या संशयीतांविरूद्ध फिर्यादीने मालवण पोलीस ठाण्यात दागिने चोरल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय्य संहिता कलम 305 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याकामी मालवण पोलिसांचा तपास सुरु असताना संशयीत अमृता अमर म्हापणकर राह. कुंभारमाठ ता.  मालवण व राघो सूर्यकांत राऊत राह. सुकळवाड ता. मालवण यांनी मे. सत्र न्यायालय ओरोस येथे दाखल केलेला अटकपूर्व जामीन मे. न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मालवण पोलीसांनी संशयीताना ताब्यात घेतले होते. मालवण पोलिसांनी दि. 25/03/2025 रोजी संशयितांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात हजर केले व गुन्ह्याचे तपासाकरीता 10 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. सुनावणीअंती गुन्ह्याचे तपासकामात संशयीतांची पोलीस कोठडीची आवश्यकता विचारात घेऊन मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मालवण यांनी संशयितांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्याचे कामी पुढील तपास मालवण पोलिस ठाण्याचे स.पो.नि. श्री. खाडे करीत आहेत.

error: Content is protected !!